नागपूर - दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत चौघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. मृतांत दीड वर्षीय चिमुरड्यासह आईचा समावेश आहे.
पहिली घटना नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मनोज जोहर व निलेश हे दुचाकीने अमरावतीकडे जात असताना पाठीमागून एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसरी घटना नागपूर-जबलपूर मार्गावरील पिवळी नदी परिसरात घडली. अमोल गोंडुले हे पत्नी रजनी तसेच मन व मानव या दोन्ही मुलांना घेऊन मावशीकडे जात होते. पिवळी नदीजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात रजनी गोंडुले व दीड वर्षांच्या मनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अमोल आणि मानव हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त जमावने अपघातातील ट्रक जाळले. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लोकांवर सौम्य लाठीमार केला.