आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला, ४३ बैलांची सुटका, एकाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- कत्तलीसाठी निर्दयीपणे बैलांना कोंबून अवैधपणे वाहून नेणारा ट्रक पारवा नाक्यावर ड्युटी बजावत असलेल्या पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांनी पकडला. या ट्रकमध्ये तब्बल ४३ बैल निर्दयीपणे कोंबण्यात आले होते. ही जनावरे वाहून नेणाऱ्या एकाला पारवा पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रकचालक फरार झाला आहे. ही कारवाई आज १० जून रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणातील अब्दुल गनी बाबु खान रा. मध्यप्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोहत्या आणि जनावरांच्या निर्दयी वाहतुकीस बंदी असताना जिल्ह्यात जनावरांची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे वारंवार उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळ शहरात अशाच प्रकारे जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला होता. अशातच पुन्हा एकदा घाटंजी तालुक्यातील पारवा नाक्यावर नाकाबंदी करीत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पहाटे जनावरे वाहून नेणारा ट्रक आढळून आला. पारवा पोलिसांनी ट्रक अडविला. यावेळी ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये ४३ बैल आढळून आले.
पोलिसांनी सर्व बैलाची सुटका केली असून त्यांना वडगाव जंगल पोलिस स्टेशन हद्दीतील गोरक्षणात पाठवण्यात आले. या प्रकरणी ताब्यात असलेल्या अब्दुल गनी बाबु खान याची पोलिस कसून चौकशी करीत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी साहेबराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.
कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी करण्यात आलेली असताना मोठ्या प्रमाणावर जनावरांची वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारच्या घटना यवतमाळमध्ये यापूर्वी अनेकदा उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून वाहनांची कसून तपासणी करण्याची मागणी केली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...