आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चायनीज वस्तूविरहीत खरेदीला ग्राहकांनी दिली पसंती, चायनीज वस्तूंच्या विक्रीत 50% घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - यंदाची दिवाळी देशात निर्मित वस्तुंद्वारेच साजरी करायची असा निर्णय घेतलेल्या नागरिकांनी काहीशी चमक आणि थोडावेळ वाटणाऱ्या आकर्षणाचा मोह बाजूला सारून चायनीज वस्तू विरहीत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिवाळीच्या पर्वावर बाजारातील चायनीज वस्तूंच्या घटलेल्या विक्रीवरून दिसून आले. 
 
स्वदेशी वस्तूंद्वारे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन गेल्या काही दिवसांपासून केले जात आहे. त्याला प्रतिसाद म्हणा किंवा देशात निर्मित वस्तूंचे पावित्र्य जाणून हा फरक पडल्याचे दिसून येत आहे. 
 
दोन वर्षांपूर्वी पणत्या कमी आणि इलेक्ट्रिकच्या वस्तूच अधिक दिसायच्या. वापरण्यास सोप्या आणि स्वस्त असल्यामुळे चायनीज वस्तू वापरण्याकडे सर्वसामान्यांचा कल दिसून येत होता. मात्र भारतीय वस्तुंप्रमाणे या वारंवार वापरता येत नाहीत. एकदा वापरल्या की खराब होतात. आकर्षकपणाही तेवढ्यापुरताच असतो, याची जाणिव झाल्यामुळे ग्राहकांनी या वस्तूंची खरेदी स्वत:च कमी केल्याची माहिती ज्ञानेश्वर मोहोड या खरेदीदाराने दिली. आपल्या देशात निर्मित वस्तू या सुंदर, पारंपरिक, टिकाऊ आहेत. पणत्यांचाच विचार केला तर त्यांचे अनेक आकार प्रकार आहेत. अशा आकर्षक पणत्यांनी घर प्रकाशमान करण्याची आपली परंपरा आहे. विजेचे दिवे आपण या प्रकाशात भर घालण्यासाठी वापरतो. चायनीज आकाशदीप हे विविध आकारांचे असले तरी भारतीय बनावटीचे आकाशदीपही काही कमी देखणे नाहीत. विविध आकार, प्रकारात ते उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या आधारे घर सजवणेच आम्हाला योग्य वाटते, असे मत एम.कांडलकर यांनी व्यक्त केले. 
 
मोबाईल फोन घेतानाही ते चायनीज आहेत काय, याची शहानिशा होताना दिसली. अगदी ऑनलाईन खरेदी करतानाही ग्राहकांनी भारतीय मोबाईल फोनला पसंती दिली. त्यामुळे चायनीज बनावटीचे मोबाईल यंदाच्या दिवाळीत अमरावती शहरापुरता विचार केल्यास कमी खरेदी करण्यात आल्याची माहिती मोबाईल विक्रेत्या दुकानदाराने दिली. 

माेठ्या सणासाठी पवित्र वस्तूच हव्यात : भारतदेश हा पवित्र असून , या देशात निर्मित वस्तूही तेवढ्याच पवित्र असल्याचे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही दुकानात गेलो की ही वस्तू देशात निर्मित आहे की नाही, याची खातरजमा करूनच ती विकत घेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे लक्ष्मीपूजन पवित्र वातावरणात साजरे होणार याचा आनंद आहे,अशी प्रतिक्रिया जया भागवत या गृहिणीने व्यक्त केली. 
 
५० ते ५५ टक्क्यांनी विक्रीत घट : चायनीजइलेक्ट्रॉनिक्स आणि विजेच्या वस्तूंच्या विक्रीत ५० ते ५५ टक्क्यांनी घट झाली आहे. विजेच्या माळा घेताना बहुतांश ग्राहक ही भारतीय की चीनमध्ये निर्मित अशी विचारणा करीत होते. त्यामुळे आम्हालाही नाईलाजाने देशात निर्मित वस्तू काहीशा महाग असल्या तरी त्या ग्राहकांना द्याव्या लागल्या, अशा प्रतिक्रिया शहरातील इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी दिल्या. 
 
चायनीज ठप्पा बघून खरेदी : आकर्षक देखणी सजावट आता भारतीय वस्तू निर्माते करायला लागले आहेत. त्यामुळे बाजारात विजेच्या माळा, विविध प्रकारचे रंगीत लाईट्स, आकाशदीप, मूर्ती, तोरण, गृहसजावटीचे सामान, कृत्रिम फुले, फुलदाण्या, पणत्या, छायाचित्रे, मोबाईल आणि फटाके अशा एका ना अनेक वस्तू चायनीज ठप्पा बघून खरेदी करण्यात आल्याची माहिती अनेक ग्राहकांनी दिली. पारंपरिक भारतीय सजावटीच्या वस्तू, फ़ुलदाण्या, दीपमाळा, झुंबर, फटाके, मिठाई, फराळाचे साहित्य, झाडण्या, झाडू अशा एक ना अनेक वस्तूंची खरेदी ग्राहकांनी दिवाळीनिमित्त केली. 
बातम्या आणखी आहेत...