आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात पाेलिसांनी पहाटे शिबिराला घेरून नक्षलवाद्यांना घातल्या गाेळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात झिंगानूर पोलिस ठाण्यांतर्गत कल्लेडच्या जंगलात पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकाने नक्षलवाद्यांच्या शिबिरावर हल्ला चढवत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या कारवाईत ठार झालेल्या नक्षलीत पाच महिलांचा समावेश अाहे.    


सध्या नक्षलींचा पीएलजीए सप्ताह सुरू आहे. गेल्याच आठवड्यात नक्षलवाद्यांनी सीअारपीएफच्या दोन जवानांना ठार मारल्याच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या पोलिसांनी छत्तीसगड सीमेवर दुर्गम भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. या ऑपरेशनसाठी स्वत: अतिरिक्त पोलिस महासंचालक (स्पेशल ऑपरेशन्स) डी.कनकरत्नम व पोलिस महानिरीक्षक शरद शेलार हे अधिकारी गडचिरोलीत तळ ठोकून आहेत. कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केंद्रीय राखीव पोलिस दल आणि सी-६० कमांडो पथके संपूर्ण परिसर पिंजून काढत असताना सिरोंचा तालुक्यापासून ६० किलोमीटर अंतरावरील कल्लेडच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबिर असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती मंगळवारी रात्रीच पाेलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिबिर घेरून नक्षलवाद्यांचा थेट खात्मा करण्याची योजना सी-६० पथकाचे कमांडर मोतीराम मडावी यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी ही माेहीम फत्ते केली. 

 

अशी झाली कारवाई  
वीस तास जंगलात पायपीट करुन नक्षलींच्या शिबिराचा माग काढल्याने पाेलिसांनी बुधवारी पहाटे त्यांना घेराव घातला. सकाळी साडेसहाच्या सुमारास पथकाने गोळीबार सुरू केला. गाफील असलेल्या नक्षलवाद्यांची पळता भुई थोडी झाली. त्यांनीही प्रत्त्युत्तर देत गाेळीबार केला. मात्र या चकमकीत  पाच महिला आणि दोन पुरुष नक्षली ठार झाले. अनेक जण गंभीर अवस्थेत पळून गेल्याचे कळते.

 

निष्पापांच्या हत्येचा बदला    
नक्षलींच्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीचा १७ वा स्थापना सप्ताह २ डिसेंबरपासून  सुरू अाहे. याापूर्वीच नक्षलवाद्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून ५ नागरिकांची हत्या केली हाेती. कोटगूल येथे भूसुरुंग स्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर तवे येथील चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. त्याचा बदला घेण्यासाठी ही माेठी कारवाई करण्यात अाली.

 

२८ लाखांचे इनाम
सातही नक्षलवाद्यांचे मृतदेह पथकाच्या हाती लागले असून त्यापैकी सहा जणांची अाेळख पटली अाहे. त्यात अहेरी दलम कमांडर अायतू उर्फ अशाेक कंगा पेंदाम (३६) याचा समावेश अाहे. अाेळख पटलेल्या सहा नक्षलींवर २८ लाखांचे इनाम ठेवण्यात अाले हाेते. यापैकी अायतूवर अाठ, सुनील काेपडेवर सहा तरअखिला कुलमेथे या महिलेवर चार लाखांचे इनाम ठेवण्यात अाले हाेते.

 

मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांकडून अभिनंदन

या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी-६० पथक आणि गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन केले.

 

चार वर्षांनंतर माेठी कारवाई

२० जानेवारी २०१३ रोजी अहेरी तालुक्यात सहा नक्षलवादी मारले हाेते. त्यानंतर चार वर्षांनी ही माेठी कारवाई करण्यात पाेलिसांना यश अाले अाहे.

बातम्या आणखी आहेत...