आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार, गोवऱ्यांच्या वापरामुळे वाचली ७०० झाडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्या आणि एलपीजी दाहिनीचा वापर सुरू केल्यामुळे उपराजधानी नागपुरात गेल्या दहा महिन्यांत तब्बल ७०० झाडांची कत्तल वाचली. पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराविषयी जागृती वाढत असून त्याला लोकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे अध्यक्ष विजय लिमये यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

उपराजधानीत एकूण ११ दहन घाट आहे. त्यापैकी अंबाझरी, सहकारनगर व माेक्षधाम घाटावर गोवऱ्या नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या जातात. अंबाझरी घाटावर या व्यतिरिक्त विदर्भातील पहिलीच एलपीजी दहनवाहिनी आहे. जानेवारी ते अाॅक्टाेबर या १० महिन्यांच्या काळात १५६ मृतदेहांचा अंत्यसंस्कार गोवऱ्यांनी आणि २१० एलपीजी शवदाहिनीत करण्यात आले. एकूण ३६६ मृतदेहांवरील पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे १५ वर्षे वयाची सुमारे ७३२ झाडे तुटण्यापासून वाचल्याचा दावा लिमये यांनी केला.

एरवी लाकडांवर अंत्यसंस्कार करत असताना एका मृतदेहासाठी दोन झाडे कापावी लागतात. त्या तुलनेत एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी केवळ एक गॅस सिलिंडरच लागते. सन २०१४ मध्ये नागपुरात २३ मृतदेहांवरील अंत्यसंस्कार गोवऱ्यांनी तर २०० मृतदेहांवरील अंत्यसंस्कार एलपीजी दाहिनीद्वारे करण्यात अाला होता. या प्रमाणात चालू वर्षी वाढ झाली असून लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे लिमये यांनी सांगितले.
दहा महिन्यांत एक लाख गोवऱ्यांचा वापर
या वर्षी जानेवारी ते अाॅक्टाेबर या दहा महिन्यांच्या काळात नागपुरातील विविध घाटांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या १५६ मृतदेहांसाठी १,०९,२०० गोवऱ्यांचा वापर करण्यात आला. या गाेवऱ्या संबंधितांना नि:शुल्क पुरविल्या जातात. त्यामुळे गाेवऱ्यांवरच अंत्यसंस्कार करण्याच्या प्रमाणात अाता वाढ हाेत असल्याचे चित्र दिसून येत अाहे. ग्रामीण व निमशहरी भागातून या गाेवऱ्या अाणल्या जातात. एक महिला दिवसाला किमान २०० गोवऱ्या थापते, हे लक्षात घेता ग्रामीण भागात महिलांना या निमित्ताने रोजगारही उपलब्ध झाला आहे. चाळीस गाई-म्हशींच्या एका दिवसाच्या शेणापासून सरासरी एका मृतदेहाचा अंत्यसंस्कार होतो, असा अंदाज फाउंडेशनच्या वतीने बांधला जाताे. म्हणजे ४० जनावरांना एका दिवसाचा चारा उपलब्ध करून देण्याचे पुण्यही मिळते, अशी माहितही वियज लिमये यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
काेल्हापूर, साताऱ्यातही
शेणाच्या गाेवऱ्या अपारंपरिक ऊर्जास्राेत असल्यामुळे कार्बन फूट प्रिंटला आळा बसण्यास मदत हाेते. तुलनात्मकदृष्ट्या लाकूड दहनापेक्षा गोवरी दहनात प्रदूषणाचे प्रमाण अत्यल्प असते. महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी तसेच मध्य प्रदेशात छिंदवाडा येथे कित्येक वर्षांपासून ही पद्धत सुरू आहे. देशात दरवर्षी सरासरी ७५ लाख लोकांना अंत्यसंस्कारासाठी दीड कोटी झाडे कापावी लागतात. लोकांनी पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार केल्यास इतकी झाडे वाचू शकतात.
बातम्या आणखी आहेत...