आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नऊ पालिकांसाठी ७३.१९ टक्के मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील नऊ नगर पालिकांच्या नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी रविवारी मतदान शांततेत पार पडले. सकाळी मतदान केंद्रांवर पाठ फिरवलेल्या मतदारांनी दुपारनंतर मात्र मतदानासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील नऊही पालिकांसाठी सरासरी ७३.१९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली. दरम्यान, शेंदुरजना घाट येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आमदार डाॅ. अनिल बोंडे यांच्याविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केल्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. उद्या,सोमवारी सकाळी वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
निवडणुकी दरम्यान सकाळपासून दुपारपर्यंत मतदारांचा उत्साह फारसा नव्हता. त्यामुळे सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत केवळ १० टक्के मतदारांनी हक्क बजावला. त्यानंतर सकाळी ११.३० पर्यंत २४ टक्के मतदार मतदान केंद्राकडे वळले. मात्र दु. १२ नंतर अचानक गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे केवळ दीड तासात मतदानाची टक्केवारी ४० टक्क्यांवर पोहोचली. त्यानंतर मतदानाचा जोर आणखीनच वाढला. दु. ३.३० पर्यंत जिल्ह्यात सरासरी ५७.२२ टक्के लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. नऊही न.प.क्षेत्रातील नऊ नगराध्यक्षपदासाठी एकूण ७२ आणि ९६ प्रभागातील १९८ नगरसेवक पदांसाठी एकूण १०५३ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये सीलबंद झाले. सोमवारी(दि. २८) दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

शेंदुरजनाघाट येथे आमदारांविरुद्ध आचार संहिता भंगाची तक्रार :शेंदुरजना घाट यथे ऐन मतदानाच्या दिवशी आमदार डाॅ. अनिल बोंडे यांनी मतदाराच्या घरी जाऊन दबाव टाकला. तसेच गाडीवर पक्षाचे चिन्ह लावून वाहन संपूर्ण शहरात फिरवल्याची तक्रार नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केल्याने खळबळ उडाली. शेंदुरजना घाट येथील प्रभाग क्र. मध्ये डाॅ. बांेडे यांनी काही मतदारांच्या घरी जाऊन मतदानासाठी दबाव आणला. तसेच गाडीवर पक्षाचे चिन्ह लावून ते संपूर्ण गावात फिरवली.

यातच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांची सुद्धा गाडी असल्याची तक्रार नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले काँग्रेसचे उत्तम पाटील, शिवसेनेचे संदीप खडसे, प्रहारचे संतू दवंडे, प्रभाकर पाटील, सुभाष बोरकुटे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.

पावणेतीन लाख मतदारांनी बजावला हक्क :नऊही क्षेत्रातील न.प. निवडणुकीत एकूण लाख ८४ हजार ७४३ मतदारांनी आज सदस्य आणि थेट नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांना मतदान केले. यापैकी अचलपूर तालुक्यातील ८२ हजार ९५० पैकी ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर अंजनगांव सुर्जी येथे ३९ हजार ४२६ पैकी ७३ टक्के, वरुड येथे ३४ हजार ६०७ पैकी ७१ टक्के, मोर्शी येथे ३० हजार १११ पैकी ६६ टक्के, दर्यापूर येथे २८ हजार ८३७ पैकी ७३ टक्के, शेंदुरजना घाट येथे १७ हजार ६७० पैकी ७३ टक्के, धामणगाव रेल्वे येथे १७ हजार ६२७ पैकी ७२ टक्के, चांदूर रेल्वे येथे १७ हजार ३०६ पैकी ७० टक्के आणि चांदूर बाजार येथे १६ हजार २०९ पैकी ७० टक्के नागरिकांनी मतदान केले. सोमवारी कोण बाजी मारतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगर पालिकानिहाय अशी राहिली मतदानाची टक्केवारी
अचलपुरात ७४.९८ टक्के, अंजनगाव सुर्जी येथे ७६.६२ टक्के, वरुड येथे ७१.१५ टक्के, चांदुर बाजार येथे ७०.२७ टक्के, चांदूर रेल्वे येथे ६९.५८ टक्के, मोर्शी येथे ६८.९५ टक्के, शेंदुरजना घाट येथे ७३.९७ टक्के, दर्यापूर येथे ७४.११ टक्के आणि धामणगांव रेल्वे येथे ७२.२९ टक्के असे एकूण सरासरी ९३.१९ टक्के मतदान झाले. अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, मोर्शी, धामणगांव रेल्वे, दर्यापूर, चांदूर रेल्वे, चांदुर बाजार, शेंदुरजना घाट या नऊ ठिकाणी न.प. निवडणुकीत ७३ उमेदवार थेट अध्यक्षपदाच्या शर्यतीत असून नगरसेवक पदासाठी १०४७ उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी भाजप-काँग्रेस-राकाँ अशी तिरंगी लढत असल्याची मतदारांमध्ये जोरदार चर्चा होती.


जिल्ह्यात झाले मतदान
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यंदा प्रथमच नगर पालिकेचा अध्यक्ष हा थेट जनतेमधून निवडला जाणार आहे.
शहराचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बहुतांश महिला दुपारनंतर केंद्रावर पोहोचल्या होत्या. दर्यापूर येथील एका केंद्रावर महिला मतदारांची उपस्थिती लक्षणीय होती.
बातम्या आणखी आहेत...