आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Farmers Committed Suicide In Two Days In Vidarbh

दोन दिवसांत 8 शेतक-यांची अात्महत्या, विदर्भातील दुष्टचक्र थांबेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - ‘बहुतांश पेरण्या आटोपल्या आहेत. परंतु पुन्हा एकदा पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. त्यातच बँकांनी कर्ज नाकारल्यामुळे गेल्या दाेन दिवसांत विदर्भात आठ शेतक-यांनी आत्महत्या केली,’अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली.

सहकारी बँकांना दोन हजार कोटींची सरकारची हमी आवश्यक असताना फक्त २५ कोटी दिल्याने विदर्भातील ४ लाखांवर शेतक-यांना पीककर्ज वाटप झालेले नाही. त्यातच पावसाने दडी दिल्याने दुबार पेरणी कशी करावी या चिंतेपोटी मागील यवतमाळ जिल्ह्यातील चार तर अमरावती व वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन शेतक-यांनी आत्महत्या केली अाहे, असे तिवारी यांनी सांगितले. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाटखेड येथील आदिवासी शेतकरी पांडुरंग मडावी, पांढरीचे मारोतराव एटरे, शिरसगावचे अमोल वहिले, टाकळी येथील महीला शेतकरी गुजाबाई मडावी तर अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जन्याचे संतोष चतुले व भिवापुरचे श्यामराव कोकार्डे आणि वर्धा जिल्ह्यातील पोरगव्हाणचे दिनेश भोंडे व गोहदाचे सतीश सिदराम यांचा समावेश आहे. यावर्षी विदर्भात ८०२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या.

शासनाच्या निष्काळजीपणामुळे हवालदिल शेतकरी जीवनयात्रा संपवत अाहेत,असा आरोप तिवारी यांनी केला. एकीकडे मुख्यमंत्री कर्जमाफीचा विचार सुरु आहे असे सांगतात तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तिजाेरी रिकामी असल्याने सातबारा कोरा करता येत नसल्याचे सांगतात. या सरकारला शेतकरी आत्महत्यांचे गांभीर्य नाही, असा अाराेपही त्यांनी केला.

सरकारच्या उदासीनतेमुळेच शेतक-यांवर ही कठीण परिस्थिती आली असल्याचे तिवारी म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेने महाराष्ट्राचे कृषी संकट संपणार ही सरकारची दिवाळखोरी असून, यावर्षी बारमाही सिंचनाची सोय असणा-या हजारो शेतक-यांना कापूस, सोयाबीन, धानाला व तुरीला भाव न मिळाल्यामुळे झालेले नुकसान मुख्यमंत्र्यांनी पाहावे, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे.

६० टक्के गावे दुष्काळग्रस्त
पूर्णत: खरीप पीक नष्ट झाल्यामुळे ६० टक्के गावे दुष्काळग्रस्त आहेत. यामुळे ९० लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून, जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापूस, तूर, सोयाबीन व दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.