आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवीपर्यंत थेट उत्तीर्ण करण्याचे प्रकार बंद करावेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे- प्राथमिकपासून ते नववी वर्गापर्यंतची परीक्षा पद्धती आणि मूल्यमापनात आमूलाग्र बदल घडवून, गुणवत्ता नसताना विद्यार्थ्यांना गुण देऊन प्रमोट करण्याचे प्रकार पूर्णपणे बंद व्हायला हवे. तरच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सवय लागून नववीतील ड्रॉपआऊटला आळा बसू शकेल, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
दहावीच्या निकालात पत राखण्यासाठी अनेक शाळा अभ्यासात कच्च्या विद्यार्थ्यांना नववीतच ड्राॅपअाऊट करत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच ‘दिव्य मराठी’ने उजेडात अाणला हाेता. त्यावर नागपुरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबा नंदनपवार म्हणाले, ‘नववीत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ड्रॉपआऊट होण्याच्या समस्येला केवळ एकच कारण पुरेसे नाही. आजवर आठवीपर्यंत परीक्षाच नव्हत्या. त्यामुळे गुणवत्ता नसतानाही अनेक मुले प्रमोट होत गेली. त्यामुळे ती कमकुवतच राहिली. नववीत आल्यावर ती एक्स्पोझ झाली. नववीपासून बराचसा सीबीएसई पॅटर्न आला आहे. अभ्यासक्रम आणि परीक्षेचे पॅटर्न सातत्याने बदलत असल्याने शिक्षकवर्गही गोंधळलेला असतो. शिक्षकांचे प्रबोधन त्यांना अपडेट करण्याची पुरेशी व्यवस्था नाही. ग्रामीण भागात शिक्षकांच्या गुणवत्तेचा स्तर कमी आहे. त्यांच्याही मागे अनेक कामे लावली गेली आहेत. या साऱ्या घटकांचा एकत्रित परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे प्राथमिक ते नववी दरम्यानची परीक्षा पद्धती व मूल्यमापन पद्धतीत आमुलाग्र बदल घडवून गुणवत्ता नसताना गुण देण्याचे प्रकार बंदच व्हायला हवे.’

स्वयंअध्ययनाची पद्धती हवी : रेणू काेरडे
अनुदानासाठी शंभर टक्के निकाल लावण्याच्या नादात अशा व्यवस्थांना अाश्रय दिला जाताे. ड्राॅपअाउट केल्याने विद्यार्थ्यावर प्रचंड मानसिक अाघात हाेताे. ताे जर अभ्यासात कच्चा अाहे तर त्याला सुधरवण्यासाठी शाळा अाधीच प्रयत्न का करीत नाहीत? अशा कच्च्या विद्यार्थ्यसाठी जादा तासिका घ्याव्यात अाणि त्यांनाही गुणवत्तेत इतरांच्या रांगेत अाणावे. स्वयंअध्ययनाची पध्दती अंगीकारणेही गरजेचे अाहे, असे मत नाशिकमधील शिक्षण तज्ज्ञ रेणू काेरडे यांनी व्यक्त केले.

देशात घ्या एकच परीक्षा : अदवंत
नववीच्या वर्गात विद्यार्थ्यांना ड्रॉपआऊट करण्याचा प्रकार तसा नवीन नाही. तो बंद व्हावा. यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्याकिरता शासनच नव्हे, तर शिक्षण विभाग स्तरावर विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. वन नेशन वन एक्झाम या पर्यायाचाही विचार होऊ शकतो, असे मत अाैरंगाबादेतील शिक्षणतज्ज्ञ प्रा. शरद अदवंत यांनी व्यक्त केले.

उपचारात्मक अध्यापनाची गरज
> दहावीचा निकाल उत्तम हवा असेल तर नववीचा निकाल कडक लावा, असे चित्र सार्वत्रिक आहे. ते बदलायचे असेल तर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा प्रत्येक शैक्षणिक पातळीवर ‘उपचारात्मक अध्यापन’ (रेमेडियल टिचिंग) करणे गरजेचे आहे. एकदम नववीतून दहावीत जाताना नापासाचा शिक्का मारणे योग्य नाही. नापास विद्यार्थी ही वस्तुस्थिती असेल तर नापास का झाला?, या संशोधनाची गरज आहे.
- डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षण तज्ज्ञ, पुणे