आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत 950 उमेदवारांचे भाग्य सीलबंद, ‘स्ट्रॉंग रुम’ला कडेकोट पोलिस बंदोबस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ग्रामीण विकासाचा केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मंगळवार (दि. २१ फेब्रु.) रोजी उत्साह व शांततेत सुमारे ६५ टक्के मतदान झाले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ९५० उमेदवारांचे भाग्य मतदारांनी बटन दाबून ईव्हीएम मशिनमध्ये सीलबंद केले.
 
मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेने संपूर्ण जिल्ह्यातच चांगली व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवला होता. जि.प.व पंचायत समित्यांची निवडणूक यावर्षी प्रथमच सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढवित असल्यामुळे मतदारांसह सर्वच राजकीय पक्षात मतदारांनी नेमके कोणाच्या पारड्यात दान टाकले याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी  होणार असून आता जि प व पंस वर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो याची सर्वसामान्यांना उत्सुकता  आहे. जिल्ह्यात जि.प.च्या चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, धारणी, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा या चौदा तालुक्यातील ५९ जागांसाठी ४१७ उमेदवार तर चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली, नांदगाव खं. या दहा पंचायत समितीतील ८८ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या ५३३ उमेदवारांच्या भाग्याचे मतदारांनी बटन दाबले. जिल्ह्यात १७८७ केंद्रांवर  ३१४१ मतदान यंत्राचा वापर करण्यात आला. रात्री  उशिरापर्यंत ईव्हीएम मशीनचा आढावा घेण्यात प्रशासकीय यंत्रणा व्यस्त होती.

‘स्ट्रॉंग रुम’ला कडेकोट पोलिस बंदोबस्त  
सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मतदान शांततेत पार पडले. दुपारी ३.३० वाजेपर्यत ४८.१८ टक्के मतदान झाले होते. ईव्हीएम मशीन आज रात्रीपर्यत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्ट्रॉंग रुम मध्ये सुरक्षित ठेवण्यात येतील.
बातम्या आणखी आहेत...