आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: अमरावती: धारणी तालूक्यात महिनाभरात कुपोषणाचे 96 बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारणी- धारणी तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांअतर्गत जून महिन्यात कुपोषणामुळे ९६ कोवळ्या बालकांचे कलेवर आदिवासींना उचलावे लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दरम्यान, तालुक्यात अजूनही “कोवळी पानगळ’ सुरूच असून, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मेळघाट दौऱ्यादरम्यान केवळ ३४ कर्मचारी डॉक्टरांच्या जीवावर दुर्गम १६० गावांमध्ये पाहिलेले ‘झीरो मिशन’चे स्वप्न फेल ठरल्याचे दिसत आहे. 

धारणी तालुक्यातील १६० गावांचे आरोग्य सांभाळण्यासाठी कळमखार, साद्राबाडी, बिजुधावडी, हरिसाल, बैरागड, धुळघाट रेल्वे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक स्त्री, आरोग्य सहायक पुरूष, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, चालक, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ सहायक, परिचर अशी एकूण ४२ पदे मंजूर आहेत. यापैकी ३४ पदे भरण्यात आली असून आठ पदे रिक्त आहेत. मुळात १६० गावांचे आरोग्य सांभाळण्यासाठी ही आरोग्य यंत्रणा त्रोटक स्वरुपाची दिसून येत आहे. अशा अपुऱ्या यंत्रणाच्या जीवावर कुपोषणाची लढाई लढली जात असून, अपुरी साधने, सुविधांच्या अभावामुळे जून महिन्यात ९६ बालकांना कुपोषणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अंगणवाडीच्या कुपोषणाच्या विविध श्रेणीच्या रेकार्डनुसार सुमारे २१ हजार १९७ बालके कुपोषणग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कर्तव्यापेक्षा व्यवसायाला प्राधान्य
राणीगाव, रंगुबेली, मोगर्दा, चुनखडी, मोखा, उतरवली, बोड, भांडुम तेलखार, पाटिया, सुसरदा, पाणखालिया येथील फिरत्या पथकाचे दवाखाने काही मानसेवी डाॅक्टरांच्या कामचुकारपणामुळे तर कुठे दवाखाने कुलूपबंद करुन डाक्टरांनी धारणी शहरात सेवेत राहून खासगी दवाखाने सुरू केल्याने रुग्ण कुपोषितांना उपचार मिळेनासे झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. 

तीनच रुग्णालयांमध्ये मिळेत बुडीत मजुरी
मेळघाटातउपचारासाठी कुपोषित बालकांना धारणी, चिखलदरा आणि चुरणी या तीनच रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर आदिवासी विकास विभागाकडून पालकांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांना बुडीत मजुरी देण्याची योजना आहे. परंतु उर्वरीत मेळघाटातील दुग॔म अतिदुग॔म भागातील गावखेडयातील रुग्णांसाठी असणाऱ्या कळमखार, बैरागड, हरिसाल साद्राबाळी, बिजुधावडी, धुळघाट रेल्वे सेमाडोह ,हतरु, काटकुंभ ,सलोना टेमब्रूसोंडा सारख्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र अद्यापही कुपोषित बालकांच्या माता -पित्यांसाठी स्वतंत्र बुडीत मजुरीची सोय करुन देण्यात आलेली नाही. 

कुपोषणाचे प्रयत्न थिटे
कुपोषणमुक्त करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.शासकीय असमन्वय, निरक्षरता दारिद्र्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिकच वाढत आहे. हे लक्षात येताच अलिकडे बाल विकास खात्यामार्फत आंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहारासोबत तीव्र अतितीव्र (सॅम -मॅम )बालकांना पुरक पोषक आहार पुरविण्याचा कागदोपत्री देखावा दिसत असला तरी मृत्यूंच्या संख्येमुळे प्रयत्न थीटे पडत असल्याचे दिसून येत आहे. 

कुपोषणासाठी अनेक घटक जबाबदार 
कुपोषण मातामृत्यूलाआळा घालण्यासाठी अनेक अडचणींचा सध्या सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांचा भूमका, पडियालांवर मोठा विश्वास आहे. रिक्त पदांचा अनुशेष जबाबदार आहे. 
-डॉ.शरद जोगी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी, धारणी. 
बातम्या आणखी आहेत...