आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याघ्रदर्शनास कुटुंबाला लागतील 10 हजार; ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात शुल्कवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटकसंख्या लाभलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शुल्कवाढीमुळे पर्यटकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.  या नव्या निर्णयामुळे आता एका सफारीसाठी एका कुटुंबाला साधारणतः १० हजार रुपये मोजावे लागतील. भारतीय आणि विदेशी पर्यटक यांना सफारीसाठी सारखेच पैसे मोजावे लागणार आहेत.   


ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाची ऑनलाइन आरक्षण सुविधा ९ जानेवारीपासून पुन्हा सुरू झाली. १ फेब्रुवारीपासून येथील सफारींना पुन्हा प्रारंभ होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी आठवड्यातील विविध दिवसांच्या सफारीचे बुकिंग करणाऱ्यांना प्रति व्यक्ती १ हजार रुपये, तर शनिवारी आणि रविवारी बुकिंग करणाऱ्यांना २ हजार रुपये शुल्क द्यावे लागेल. तत्काळ बुकिंगसाठी आता प्रति व्यक्ती ४ हजार रुपये शुल्क आकारले जाईल. असा निर्णय वन विभागाने जाहीर केला आहे. तत्काळ ऑनलाइन आरक्षण सफारीच्या तीन दिवसांपूर्वी सकाळी ८ वाजता सुरू होईल आणि दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ५ वाजता बंद होईल, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वन संरक्षकांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 


व्याघ्रदर्शन तुरळक, पर्यटन महागडे   
प्रति व्यक्ती शुल्काव्यतिरिक्त गाइडचे ३५० रुपये आणि  जिप्सीसाठी २२०० रुपये द्यावे लागतील. त्यामुळे, दोन महिने आधी बुकिंग करणाऱ्या कुटुंबांना एका सफारीसाठी तब्बल दहा हजार रुपये खर्च येईल. ताडोबा प्रकल्पात वाघांची संख्या जास्त असली तरी पर्यटकांना मात्र  माया, छोटी तारा, मटकासुर किंवा सोनम यांच्यासारख्या मोजक्या वाघांचे दर्शन घडते. त्यामुळे, मोजक्या वाघांचे दर्शन घेण्यासाठी सामान्य पर्यटकांना हे दर परवडणार नाहीत. शिवाय, तेच ते वाघ दिसत असल्याने छायाचित्रणासाठी जाणाऱ्या छायाचित्रकारांनाही इतके दर देणे परवडणारे नसल्याचे मत व्यक्त होत आहे.   


पुढील स्‍लाइडवर पाहा, ताडोबाचे नवे दर... 

बातम्या आणखी आहेत...