आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ- विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या शिक्षणमंत्र्यांच्या पुढे मांडण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा ताफाच अडवला. शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शहरातील आर्णी मार्गावर अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती. यावेळी शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकूण घेत त्यासंदर्भात लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन आंदोलकांना दिले.
राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त यवतमाळ दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांच्या वाहनांचा ताफा आर्णी मार्गाने जात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अचानकपणे त्यांच्या वाहनांच्या ताफ्यापुढे येऊन त्यांचा ताफा अडवला. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्या वाहनाला घेराव घातला. ही बाब पाहताच विनोद तावडे यांनी वाहनाबाहेर येऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू केली. यावेळी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी विनोद तावडे यांच्यापुढे विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाढाच वाचला. त्यासोबत या सर्व समस्या निकाली काढण्याची कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन विनोद तावडे यांना दिले.
या निवेदनात नवीन २०१६ विद्यापीठ कायद्यांमध्ये छात्रसंघ निवडणुका खुल्या पद्धतीने होतील असे नमूद केले होते परंतु महाराष्ट्रामध्ये आता छात्रसंघ निवडणुका या जुन्या पद्धतीने लागू करण्यात आल्या आहेत. या निवडणूका खुल्या पद्धतीने घेण्यात याव्या. राज्य सरकारने कला व वाणिज्य क्षेत्रात अन्यायकारकरित्या सेमिस्टर पॅटर्न लागू केले आहेत. त्यात अमरावती विद्यापीठाने असा नियम काढला की, विद्यार्थ्यांचे पेपर हे त्यांच्याच महाविद्यालयात तपासण्यात येईल. असे केल्यास शिक्षणाचा दर्जा घसरल्या जाणार आहे. त्यामुळे सेमिस्टर पॅटर्न बंद करावे. त्याच प्रमाणे गेल्या दोन-तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या थकीत शिष्यवृत्त्या त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी. फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हे २४०० ते २५०० रुपये तर बॅकलॉक शुल्क हे १५०० ते १६०० रुपये इतके आकारण्यात येत आहे. हे शुल्क विद्यार्थ्यांकरिता अन्यायकारक आहे तरी त्यांचे परीक्षा शुल्क आणि बॅकलॉक शुल्क हे माफक दरात असावे अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
या सर्व मागण्या अभाविपने शिक्षणमंत्र्यांसमोर मांडल्या असता, त्यांनी आंदोलकांशी चर्चा करुन या सर्व मागण्यांची पूर्तता लवकर करू असे आश्वासन दिले. यावेळी अभाविप विदर्भच्या प्रांत सहमंत्री मयुरी पंचबुद्धे, े नगर सहमंत्री युवराज आगळे, तेजस नेमाडे, प्रणय पवार, कौस्तुभ मोहदरकर, प्रांजली काशेट्टीवार, प्रांजली दंडे, कीर्ती खडसे, गौरव जगताप, शुभम पारिसे, राहुल सोयम, शक्ती केराम, कृपाल कामाठकर, अक्षय पवार, दीपक कोष्टे, नागेश भोंब्बे, निखिल डुकरे, सुधाकर जगताप, ईश्वर राऊत, संकेत देशमुख, रामा चुटके, उपस्थित होते.
'विद्यार्थी दशेत आपणही हेच केले'
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा विद्यार्थ्यांनी अडवला त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी या आंदोलकांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विनोद तावडे यांनी त्या पदाधिकाऱ्यांना थंाबवले आणि सांगितले की, विद्यार्थी दशेत असताना आपणही हेच केले आहे. मला त्यांच्याशी चर्चा करु द्या.
नारेबाजीने दुमदुमला परिसर
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा ताफा अडविल्याबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी जोरदार नारेबाजी सुरू केली. त्यांनी सुरू केलेल्या या नारेबाजीमुळे संपुर्ण परिसर दणाणून सोडला होता. विशेष म्हणजे अभाविपने केलेल्या या आंदोलनाचा कुठलाही राग न मानता विनोद तावडे यांनी त्यांचे कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.