आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर- माजी खासदार नाना पटोलेंचा राजीनामा, काँग्रेस प्रवेशाने भाजप- काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरते आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस. राष्ट्रवादी आघाडी करणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार, हे स्पष्ट व्हायचे असल्याने भाजपने संभाव्य उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले. प्रतिस्पर्धी स्पष्ट झाल्यानंतरच उमेदवार जाहीर करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान आहे. निवडणुकीसाठी जेमतेम महिना शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या तिन्ही पक्षांनी उमेदवारांबाबत मौन बाळगले. माजी खासदार नाना पटोलेंनी पंतप्रधानांसह भाजप नेत्यांवर आरोप करीत राजीनामा दिला होता. त्यामुळे पटोलेंना धडा शिकवण्यासाठी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. राजीनामा देणारे पटोले काँग्रेसवासी झाले. त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठा पूर्ण झाली. मात्र, आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यातील आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर गेल्याने त्यांनी यापूर्वीच ही निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली. या परिस्थितीत निवडणुकीत आघाडी होऊन मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र उमेदवार देणार, हे स्पष्ट झालेले नाही. दोन्ही पक्षांत उमेदवारांची चर्चा सुरु आहे. काँग्रेसने माजी खासदार पटोलेंनाच लढण्याचा आग्रह धरला असून त्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवला. राष्ट्रवादीतर्फे भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडेंच्या नावाची चर्चा आहे. जि. प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकरही इच्छुक आहेत. भाजपात उमेदवारीसाठी माजी आमदार हेमंत पटलेंसह डॉ. खुशाल बोपचे, शिशुपाल पटले यांंची चर्चा आहे. उमेदवार निवडीसाठी भाजपच्या बैठका झाल्या असून मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उमेदवार निश्चित करणार आहेत. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पत्ते उघड होईपर्यंत नाव जाहीर केले जाणार नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.