आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा पोलिसांचा 'फिरते पोलिस ठाणे' उपक्रम आता राज्यभरात; 111 गावात 21 तक्रारींचे निवारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भंडारा पोलिसांचा “फिरते पोलिस ठाणे’ हा उपक्रम आता  राज्यभर राबवला जाणार आहे. भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक वनिता साहू यांच्या पुढाकारातून  हा अभिनव उपक्रम जानेवारी २०१७ मध्ये सुरू करण्यात आला. त्यानुसार, तालुका स्तरावर पोलिस आणि नागरिकांच्या बैठका आयोजित करून त्यात जनतेच्या कायदे आणि पोलिसांसंबंधी तक्रारींचे निराकरण करण्यात येते. देशात प्रथमच भंडारा जिल्ह्यात सुरू झालेल्या या उपक्रमापासून प्रेरणा घेत चंदिगड, मध्य प्रदेश व वडोदरा पोलिसांनीही हा उपक्रम सुरू केला आहे. २०१७ मध्ये एकूण ७८० गावांमध्ये १९९ तक्रारींचे निवारण करण्यात आले.  २०१८ मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी १७ पर्यंत १११ गावात २१ तक्रारींचे निवारण करण्यात आले.  घटना गावातच सोडवता येत असल्यामुळे पोलिसांवरील ताणही कमी झालेला आहे.  गावागावातील वाद, महिला तसेच विद्यार्थिनींचे प्रश्न, गावात चालणारे अवैध  धंदे, अनिष्ट रूढी व परंपरांमुळे ग्रामस्थांना होणारा त्रास अनेकदा पोलिसांची भानगड नको म्हणून पोलिस ठाण्यापर्यंत येत नाही.  त्यामुळे अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तींचे फावते.  यावर  उपाय म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे पोलिस अधीक्षक वनिता साहू यांनी सांगितले.  

 

असा आहे उपक्रम  
“फिरते पोलिस ठाणे’ या उपक्रमांतर्गत आठवड्याचा प्रत्येक शनिवारी जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणी तालुक्यातील  एका गावाची निवड करून नागरिकांचे प्रश्न गावातच सोडवतात. आतापर्यंत अनेक गावांतील २२० तंटे कुठलाही एफआयआर दाखल न करताच सुटले आहे.    
भंडारा जिल्ह्यात १७ पोलिस ठाणी असून त्या अंतर्गत १४०० च्या आसपास पोलिस आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याला निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्यामुळे एकट्या तालुक्याचा भार  सांभाळताना पोलिसांच्या नाकीनऊ  येतात. अपुऱ्या संख्येमुळे अनेक वेळा गावातील परिस्थिती कशी सांभाळावी, असा प्रश्न पोलिसांसमोर येत होता. त्यातून या उपक्रमाची कल्पना सुचली.  

 

गृहविभागाकडून पोिलसांना
उपक्रमासाठी साहित्याची मदत  

या उपक्रमासाठी गृह विभागाने साहित्य पुरवले.  या उपक्रमात गावात तंबू ठोकायचा असल्याने शामियाना, प्रोजेक्टर, स्क्रीन, माइक सिस्टिम, उपक्रमाची माहिती देणारे पोस्टर्स, एम्प्लिफायर तसेच फर्निचर आदी साहित्य भंडारा पोलिसांना पुरवण्यात आले आहे.  


वेगळे पोलिस पथक  
“फिरते पोलिस ठाणे’ उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी वेगळे पोलिस पथक स्थापन केले जाईल. यात पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नायक, पोलिस शिपाई यांचा समावेश असेल. उपलब्ध कर्मचाऱ्यांमधूनच या पथकात निवड केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...