आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात विराेधकांचे \'लक्ष्य\' मुख्यमंत्रीच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील कायदा व सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी, कर्जवाटपातील घोळ, शेतकरी आत्महत्या, प्लास्टिक बंदीचा फज्जा, मराठा व धनगर आरक्षणाच्या मुद्यांवर विरोधी पक्ष विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अलीकडेच राज्यात घडलेल्या घटना पाहता कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर मुख्यमंत्रीच विरोधकांचे लक्ष्य राहतील, अशी चिन्हे दिसत आहेत. 


बुधवारपासून नागपुरात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसह कर्जमाफी व नव्या कर्जमाफीतील घोळाचे मुद्दे गाजण्याचे संकेत विरोधी पक्षांकडून मिळाले आहेत. मात्र, मागील काही महिन्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या घटना पाहता गृह खात्याच्या कारभारावर हल्लाबोल करण्याची आयतीच संधी विरोधकांना चालून आली आहे. औरंगाबादमधील दंगल, धुळे जिल्ह्यातील हत्याकांड, नागपुरातील पवनकर कुटुंबातील हत्याकांडासह राज्याला हादरवून सोडणाऱ्या घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर बनल्याचा विरोधकांचा आरोप असून मुख्यमंत्र्यांचा गृहखात्यावर कुठलाही वचक नाही, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून होत आहे. त्याचे पडसाद गोंधळाच्या स्वरूपात दोन्ही सभागृहात उमटतील, अशी चिन्हे आहेत. 


अधिवेशन नागपुरात होत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात त्यांना लक्ष्य करण्याची संधी साधण्याच्या विरोधक प्रयत्नात आहेत. नागपुरातील मागील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी जाहीर नुकसान भरपाईचा अद्याप शेतकऱ्यांना फारसा लाभ झाला नाही. केंद्राकडून एनडीआरएफच्या माध्यमातून गुलाबी बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक व धान उत्पादकांच्या खात्यात रक्कम जमा करणे सुरू आहे. मात्र, पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळू शकलेली नाही. तर बियाणे कंपन्यांकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर अद्यापही प्रश्नचिन्ह लागलेलेच आहे. नव्या कर्जवाटपात सरकारी बँकांकडून होत असलेल्या अडवणुकीमुळे राज्य शासनाचे कर्जवाटपाचे पन्नास टक्के लक्ष्य ही यंदा अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील, अशी चिन्हे दिसत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अलीकडेच उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचल्याने या मुद्यावरही अधिवेशनातील राजकारण चांगलेच रंगण्याची शक्यता दिसत आहे. 


आज विरोधकांची बैठक
पावसाळी अधिवेशनात विरोधकांचे डावपेच ठरविण्यासाठी मंगळवारी दुपारी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीतच सरकारच्या चहापानाच्या निमंत्रणासह इतर मुद्यांवर चर्चा होईल, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षातील सूत्रांनी दिली. 


शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष 
अधिवेशनात विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक राहण्याचे संकेत मिळत असताना भाजप आणि शिवसेनेतील अधिकच ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. प्लास्टिक बंदीच्या मुद्यावर शिवसेनेचे मंत्रीही विराेधकांचे लक्ष्य ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...