आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- देशातील संपन्नता वाढत असताना इंग्रजी भाषेच्या वापरासह सर्वच प्रकारचे सांस्कृतिक बदल झपाट्याने देशात घडून येत आहेत. ही परिस्थिती संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या ध्येयाला छेद देणारी असल्याने सतर्क झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आता भारतीय भाषा, बोली आणि लिपींचे संवर्धन आणि प्रसाराचा मुद्दा उपस्थित करण्यात येत असल्याचे जाणकारांचे मत अाहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अलीकडेच नागपुरात झालेल्या प्रतिनिधीसभेने भारतीय भाषा, बोली आणि लिपींचे संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करणारा ठराव संमत केला आहे. सरकार आणि समाजाच्या पातळीवर भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शासकीय कामकाज, न्यायालयीन कामकाजासह दैनंदिन व्यवहारांतही भारतीय भाषा, बोली आणि लिपींचा वापर व्हावा, अशी अपेक्षा संघाने व्यक्त केली आहे. या ठरावाचे मूळ संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या ध्येयात तसेच संघाच्या सर्व वर्गांतील विस्ताराच्या योजनेत असल्याचे जाणकारांना वाटते.
संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांच्या मते, ‘पूर्वी संघ आणि डावे पक्ष तथाकथित उच्चवर्णीयांचे असल्याचे मानले जायचे. डाव्या पक्षांच्या बाबतीत ही बाब आजही कायम असली तरी संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या कार्यकाळापासून संघाची ओबीसी वर्गांकडेही वाटचाल सुरू झाली. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, ती व्यवहारभाषा आहे. तसेच मराठी, तेलुगु, तामीळ या देशाच्या अनेक राष्ट्रभाषा असल्याचा विचार गोळवलकर गुरुजी यांनी मानला होता. स्थानिक भाषा, बोली आणि लिपींचा थेट संस्कृतीशी संबंध असतो. ते अस्मितेचे विषय ठरतात. त्यामुळे अहिंदी भाषिकांमध्ये संघाचा प्रसार करण्यासाठी स्थानिक भाषांना कायम महत्त्व दिले आहे. आजही ग्रामीण भागात संघाचा व्याप वाढवायचा तर स्थानिक भाषा, बोलींना महत्त्व द्यावेच लागेल, अशी संघाची विचारधारा आहे’, असे देवधर यांनी सांगितले.
अगदी दैनंदिन भाषेच्या वापराच्या बाबतीतही चिंताजनक स्थिती असून नव्या पिढीचा इंग्रजीकडे वाढता कल सांस्कृतिक आक्रमण ओढवून घेण्यासारखाच असल्याचे संघाच्या नेतृत्वाला वाटते. त्यावर उपाय म्हणून संघाने दोन वर्षांपूर्वी कुटुंब प्रबोधनासाठी एक स्वतंत्र विभागच सुरू केला आहे. त्या माध्यमातून सुरुवातीला संघाशी जुळलेल्या कुटुंबांमध्ये आदर्श भारतीय संस्कृती, आचार-विचारांचा प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मातृभाषेतून शिक्षणासाठी सरकारकडे धरणार अाग्रह
इंग्रजीतून नव्हे, तर मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण, मातृभाषेत उच्च शिक्षणाचा पर्याय, भारतीय भाषांमध्ये स्पर्धा परीक्षा सुरू व्हाव्यात, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या पातळीवर विशेष प्रयत्न व्हावेत यासाठी संघाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या काळात संघाकडून त्या दिशेने काही सामाजिक उपक्रम राबवले जाण्याचे संकेतही मिळत आहेत. याशिवाय मातृभाषेतून शिक्षणासाठी सरकारकडे आग्रह धरला जाणार अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.