आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅनिटरी नॅपकिन्सच्या पर्यावरणपूरक विल्हेवाटीसाठी नीरीने अन्य संस्थांच्या मदतीने विकसित केले 'ग्रीन इन्सिनरेटर'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सॅनिटरी नॅपकिन्सबाबत समाजात जागरुकता केली जाते. पण नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याची समस्या आजही अनेक भागांत कायम आहे. नॅपकिन्सची प्रदुषणमुक्त विल्हेवाट कशी लावायची? या प्रश्नाचे उत्तर नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) शोधले. काही संस्थांच्या मदतीने ग्रीनडिस्पो हे इन्सिनरेटर अर्थात ज्वलनयंत्रण विकसित केले. 


ग्रीनडिस्पो इन्सिनरेटरच्या (ज्वलनयंत्र) माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन्सची झटपट विल्हेवाट लावणे शक्य होते. त्यातून निर्माण होणारे प्रदूषण अत्यल्प असल्याचा दावा नीरीने प्रसिद्धीपत्रकातून केला. नीरीसह इंटरनॅशनल अॅडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अॅड न्यू मटेरियल्स (एआरसी, हैदराबाद) आणि सोबॉल एअरोथर्मिक्स यांनी इन्सिनरेटरची निर्मिती केली. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार व अन्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन्सिनरेटरचे लोकार्पण पार पडले. डॉ. राकेशकुमार म्हणाले की, देशात दर महिन्याला ४३ कोटी नॅपकिन्सचा कचरा तयार होतो. सॅनिटरी नॅपकिन्स नष्ट करण्यासाठी यंत्रही विकसित झाली. मात्र, त्यातून हवेतील प्रदूषणाची समस्या कायम होती. नॅपकिन्समध्ये प्लास्टिक, पॉलीमरच्या वापरामुळे ते जाळल्यावर खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ८०० ते १०५० अंश सेल्सियस एवढ्या प्रचंड उष्णता निर्माण करणारे इन्सिनरेटर विकसित करण्यात आले. या इन्सिनरेटरमध्ये नॅपकिन जाळल्यास अत्यल्प धूर निघतो. इन्सिनरेटरसाठी पेटंट नोंदणी करणार असून ते बाजारात आणण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. 


प्रदूषणावर नियंत्रण शक्य 
सॅनिटरी नॅपकिन्सची प्रदूषणमुक्त विल्हेवाट हे मोठे आव्हान होते. त्यावर उपाय म्हणून तयार करण्यात आलेले इन्सिनरेटर अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. या इन्सिनरेटरमुळे प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. 
-डॉ. राकेशकुमार, संचालक, नीरी 

बातम्या आणखी आहेत...