आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासनाने विदर्भात दुष्काळ घोषित करावा; महसूल राज्यमंत्री संजय राठोड भूमिका मांडणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- विदर्भातील केवळ सहा तालुके नव्हे तर संपूर्ण विदर्भच दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे शासनाने यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात दुष्काळ घोषित करावा, अशी भूमिका मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे मांडणार असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिली. शासनाने २५ एप्रिलला एका आदेशान्वये राज्यातील तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. यात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पाच व वाशीम जिल्ह्यातील केवळ वाशीम अशा एकूण सहा तालुक्यांचा समावेश आहे. 


राज्य शासनाने विविध निकषांच्या व आकडेवारीच्या आधारे रब्बी हंगाम २०१७-१८ मध्ये जाहीर केलेल्या या दुष्काळामुळे विदर्भातील सहा तालुके वगळता अन्य तालुक्यांवर अन्याय झाल्याची नागरिकांची भावना आहे. प्रत्यक्षात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात नागरिक मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या झळा तीव्र असताना शासनाने येथे मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याशी चर्चा करून विदर्भातील दुष्काळाची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत. केवळ तांत्रिक निकषांऐवजी वस्तुस्थितीवर आधारित पाहणी करून संपूर्ण विदर्भात दुष्काळ जाहीर व्हावा, अशी आपली भूमिका असल्याचे ना. संजय राठोड यांनी सांगितले. 


गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे सध्या संपूर्ण यवतमाळ जिल्हा भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. शिवाय कापसावरील बोंडअळीच्या प्रकोपामुळे असंख्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाने दगा दिल्याने खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांचा हातातून गेला. ही झळ केवळ पाच तालुक्यांना बसली नसून यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुके व विदर्भातील बहुतांश जिल्हे यामुळे प्रभावित झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण विदर्भात दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी आपण आग्रही आहो. शासनाकडे प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, दूर संवेदन विषयक निकष, पेरणीखालील क्षेत्र, विविध पिकांची स्थिती या घटकांचा एकत्रित विचार करून शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस, राळेगाव, घाटंजी, केळापूर या पाच तालुक्यांमध्ये, वाशीम जिल्ह्यातील वाशीम तालुका आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. तांत्रिकदृष्ट्या आकडेवारीवर आधारित दुष्काळ जाहीर झाल्याने वस्तुस्थितीशी विसंगत आहे, अशी सर्वत्र भावना निर्माण झाली आहे. पावसाने दगा दिल्याने यावर्षी कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही. सिंचनाअभावी रब्बी व उन्हाळी पीक घेण्याची सोय राहिली नाही. अशातच भीषण पाणीटंचाईमुळे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आदी प्रश्न गंभीर झाले आहेत. या सर्व बाबींचा वस्तुस्थितिदर्शक आढावा घेऊन संपूर्ण विदर्भात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामुळे तांत्रिक निकषांमुळे वंचित राहिलेल्या विदर्भातील इतर तालुक्यातही दुष्काळ जाहीर व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत लवकरच बैठक होऊन विदर्भ दुष्काळग्रस्त जाहीर होईल, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले. 


राज्यात आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देऊ 
दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, पाण्याच्या टँकरचा पुरवठा, कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे इत्यादी सवलती मिळणार आहे. सध्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांना मिळणारे हे लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास संजय राठोड यांनी व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...