आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामजन्मभूमीवर मंदिर उभारणारच, मात्र न्यायालयाच्या निकालानंतर- भय्याजी जोशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिराशिवाय दुसरे काहीच बांधले जाऊ शकत नाही. या ठिकाणी राममंदिरच उभारले जाईल, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी पुन्हा नियुक्त झालेले भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे. या प्रश्नावर विविध गटांमध्ये एकमत होणे कठीण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच बांधकाम सुरू होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.


सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राममंदिर बांधकामाच्या बाजूनेच लागेल अशी आशा व्यक्त करून या प्रश्नी न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याच्या बाजूने आपण असल्याचे जोशी म्हणाले. मात्र, गतकाळातील अनुभव पाहता हे अत्यंत कठीण असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यासंदर्भात दिले. 


भय्याजी जोशी पुढे म्हणाले, समाजात या मुद्द्यावर विविध मतप्रवाह असलेले इतके गट आहेत की त्यांच्यात  एकमत घडवून आणणे अत्यंत कठीण आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी श्री श्री रविशंकर प्रयत्न करत आहेत. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत आहे. दरम्यान, भय्याजी जोशी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी  शनिवारी पुन्हा निवड झाली. चाैथ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत.  


शेतकऱ्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे. देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे. त्यात व्यावहारिक तोडगा शोधावा लागेल. शेतीचे धोरण बदलावे लागेल. तसेच शेतकऱ्यांची मानसिकतादेखील बदलणे गरजेचे आहे. शेतमालास योग्य भाव मिळावा व त्यातील अडचणी दूर झाल्या पाहिजेत. या प्रश्नावर तोडगा निघालाच पाहिजे, असेही जोशी यांनी नमूद केले.


ते पुढे म्हणाले, लिंगायत समाजाच्या संदर्भात होत असलेली मागणी संघाला स्वीकार्य नाही. संप्रदाय वेगवेगळे असू शकतात. देशातील संप्रदायांमध्ये काही बाबी एकसमान आहेत. ते दुवे शोधूनच वाटचाल व्हायला हवी. संघ परिवारातील अनेक संघटनांना सरकारची धोरणे मान्य नाहीत, याकडे लक्ष वेधले असता भय्याजी जोशी म्हणाले, ‘प्रत्येक संघटनेला त्या त्या क्षेत्रातील प्रश्न मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. भाजपचे लोकही अंमलबजावणीतील अडचणी सांगत असतात. त्यांच्याही काही अडचणी असू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपले काम केले पाहिजे. परिवारात मतभिन्नता जरूर असेल, मनभिन्नता नाही’, असा दावाही त्यांनी केला.  

 

संघाला अनुकूल वातावरण
संघाचे कार्य समाधानकारक स्थितीत आले असल्याचा उल्लेख करताना जोशी म्हणाले, ‘संघाचे कार्य गर्दी गोळा करण्याचे नाही तर समाजात गुणांचा प्रसार करण्याचे आहे. त्यामुळे संघाच्या वाढीचा वेग लोकआंदोलनांसारखा नाही. मागील ९२ वर्षांत आम्ही मोठी प्रगती केली. देशात ८० हजार ठिकाणांवर स्वयंसेवक एकत्र येतात. समाजाचा संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून स्वीकार्यता वाढली आहे. संघाशी जुळण्यास लोक उत्सुक आहेत.’

बातम्या आणखी आहेत...