आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी लोकांना फसवले; प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार: पटोले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने भाजपला निवडून दिले. एक ही आश्वासनांची पूर्तता केली नसून मोदींनी लोकांना फसवले असून भारतीय जनता पक्षातील लोकशाही संपल्याचे टीकास्त्र माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी साेडले. प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


सत्तेत असताना काँग्रेस कधीच लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला नाही. विरोधी बाकावर असताना भाजप लोकशाहीला पूरक होता. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर पारदर्शकता येईल असे वाटत होते. लोकांनी देशात बदल घडवत भाजपला सत्ता दिली. मात्र भाजप लोकशाहीच्या मूळावरच उठल्याचे पटोले म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रथमच अशाप्रकारे वक्तव्य केल्याने ते दिसून येत अाहे. ओबीसी कमिशन लोकसभेत मंजूर केले, मात्र राज्यसभेत भाजपने अडवले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे संपूर्ण पैसे केंद्र सरकारने देणे गरजेचे असून ते अडवण्यात आले आहे. ओबीसीकरिता वैद्यकीय शिक्षणाच्या १५ टक्के जागांचे आरक्षण दिले, मात्र जागा भरण्यात आलेला नाही. जातीचे प्रमाणपत्र, जाती पडताळणी प्रमाणपत्रांची अडवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याचे पटोले म्हणाले. 


४२ टक्क्याने वाढल्या शेतकरी आत्महत्या 
शेतकरी आत्महत्या थांबवण्यात सरकारी योजना निष्फळ ठरल्यात. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या उपाययोजना तारक नाही तर मारक ठरत असून भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ४२ टक्क्याने वाढल्याचे नाना पटोले म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची मागणी केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या समितीने त्याप्रमाणे शिफारस देखील केली होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमुक्ती ऐवजी कर्जमाफी हा शब्दप्रयोग करत शेतकऱ्यांची फसवणूक केली. सरकारने आधार सक्ती आणि ऑनलाइन प्रणालीने शेतकरी व त्याच्या पत्नीला रांगेत उभे केले. ऑनलाइन अर्ज प्रणालीत मोठा भ्रष्टाचार असल्याचे सांगत या विषयाला घेऊन लवकरच मोठा गौप्यस्फोट करण्याचे सूतोवाच त्यांनी दिले.