आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमधील गर्दीत हरवलेल्या पटोलेंची अस्तित्वासाठी धडपड; काँग्रेसकडेच पुन्हा अाेढा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलांसारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून भंडारा-गोंदियाचा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणणारे खासदार नाना पटोले हे खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे अाता देशभर चर्चेत अाले अाहेत.  खरे तर भाजपची राजकीय संस्कृती त्यांना अगदी सुरुवातीपासूनच मानवली नाही. पटोलेंचा राजकीय पिंड स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व कायम राखण्याचा अाहे. त्यामुळे भाजपमधील बड्या नेत्यांच्या भाऊगर्दीत झाकोळल्या गेलेल्या पटोलेंना आपले राजकीय अस्तित्वच दिसेनासे झाले हाेते. या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठीच त्यांनी भाजपशी काडीमाेड घेतल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळातून काढला जाताे.


२००८ च्या अखेरीस काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पटाेलेंनी २००९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वर्षी त्यांनी साकाेलीतून अामदारकी मिळवली. तसेच  नंतर २०१४ मध्ये भंडाऱ्यातून लाेकसभा निवडणुकीतही विजयी झाले. सुमारे अाठ वर्षे पक्षात असले तरी ते भाजपात अजिबातच रुळले नव्हते. अगदी पक्षाच्या राजकारणातही ते फार सक्रिय नव्हते. पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात भाजपकडे पटोलेंच्या तोडीचा नेता नव्हता ही वस्तुस्थिती मान्य केली तरी पटोलेंना स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन पक्षावर प्रभाव पाडता आला नाही. केंद्र आणि राज्यात पक्ष सत्तेत असताना गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत एखादा प्रकल्प अथवा विकासाच्या योजना आणण्याचे कसबही पटोलेंना जमले नाही. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची कायम ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका राहिली. ही भूमिका बाळगताना त्यांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व ठेवण्याचे कायम प्रयत्न केलेत. अगदी काँग्रेसमध्ये असतानाही पटोले यांची हीच भूमिका राहिली. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचा कायम संघर्ष होत राहिला. बहुजन समाजातून आलेल्या या नेत्याला भाजपची संस्कृती मानवणे शक्य नव्हते. गडकरी, फडणवीस, मुनगंटीवार, हंसराज अहिर या भाजप नेत्यांच्या भाऊगर्दीत अापले भवितव्य झाकाेळले जात असल्याची भावना नेहमीच पटाेलेंच्या मनात हाेती. 


प्रफुल्ल पटेल यांची भाजपशी जवळीक जिव्हारी
राज्याच्या राजकारणातून केंद्राच्या राजकारणात आल्यावरही पटोले यांना खासदारकीच्या पलीकडे बढती मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. हे खरे पटोले यांचे दुखणे होते. अशातच त्यांचे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची भाजपशी वाढती जवळीकही पटोले यांना अस्वस्थ करून गेली. त्यातूनच त्यांची पक्षविरोधाची मानसिकता विकसित होत गेली. पटोलेंनी सुरुवातीला मुनगंटीवार यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. जय या वाघाच्या बेपत्ता होण्यावरून त्यांनी वनमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे दोषारोपण केले. मात्र, पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे पटोलेंनी थेट पंतप्रधान माेदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आगपाखड सुरू केली. भाजपच्या सध्याच्या धोरणाप्रमाणे पक्षाने त्यांची ही मळमळही अदखलपात्र ठरवली. अगदी गडकरी आणि फडणवीस या नेत्यांनीही पटोलेंच्या टीकाटिप्पणीवर प्रतिक्रिया टाळण्याचेच धोरण अवलंबले होते. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पटोलेंकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.

 

पटाेलेंची मुस्कटदाबी : काँग्रेस
कर्जमाफीच्या घोषणेला सहा महिने लाेटले तरी राज्यातील शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ झालेले नाही. खासदार नाना पटोले यांची भाजपमध्ये मुस्कटदाबी होत होती. त्यामुळेच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपचे अनेक खासदार नाराज अाहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण यांनी दिली.

 

अाता पर्याय काँग्रेसचा?
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर आता पटोले यांच्यापुढे राजकीय भवितव्याच्या दृष्टीने काँग्रेस आणि शिवसेना हे दोनच  पर्याय उरले आहेत. शिवसेनेला पूर्व विदर्भात नेतृत्व हवे आहे. मात्र, शिवसेनेची या भागातील परिस्थिती पाहता पटोले काँग्रेसचा पर्याय निवडतील, असे दिसते. त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. सक्षम नेतृत्व नसल्याने काँग्रेसलादेखील ते हवेच राहतील. पटोलेंचा राजकीय पिंड, त्यांची कार्यशैली पाहता काँग्रेसमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द कितपत बहरेल यावर प्रश्नचिन्ह मात्र कायम असेल.

 

‘काँग्रेसच्या इशाऱ्यावरून पटोलेंचा राजीनामा’

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान माेदी यांना ‘नीच व्यक्ती’ म्हटल्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काँग्रेसच्या इशाऱ्यावरून पटोले यांनी राजीनामा दिला, असा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुधाकर देशमुख यांनी केला.  काँग्रेसने अय्यर यांना निलंबित केले. मग भाजपाने पटोले यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न विचारला असता, ‘शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर कृष्णाने त्याला शासन केले होते. भाजपात संसदीय मंडळ कारवाईचा निर्णय घेते’, असे देशमुख म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...