आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्या सुरूच असल्‍याचा विरोधकांचा आरोप; मुख्यमंत्री म्‍हणाले, हे तुमचेच पाप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी साेमवारी विराेधी पक्षांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीवरून विधिमंडळात सरकारला घेरले. कर्जमाफी योजनेत सरकारने घोळ घातल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचे थकीत कर्ज संपलेले नाही. कर्जाचा डाेंगर अजूनही कायम असल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आता शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी दाेन्ही सभागृहांतील विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे यांनी केली. मात्र ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर राजकारण करू नका. तुमचेच हे पाप आहे. तुमचे मगरीचे अश्रू आहेत,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराेधकांचा समाचार घेतला.  

 

हिवाळी अधिवेशनाची गदारोळाने सुरुवात
अधिवेशनाची सुरुवात गोंधळाने झाली. विधानसभेत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. विखे यांनी सरसकट कर्जमाफी द्या, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची भरपाई द्या, शेतकरी आत्महत्यांवर कामकाज बाजूला सारून चर्चा सुरू करा, अशी मागणी केली. या गोंधळात पहिल्या दिवसाचे शासकीय कामकाज उरकून शोकप्रस्ताव सुरू करण्यात आला.  

 

शेतकऱ्यांची नावे बाँडवर लिहून द्या : विखे 
विखे पाटील म्हणाले, सरकार ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे सांगते आहे. खरोखर कर्जमाफी दिली असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचे नाव-गाव स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावे. सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. कापसाला २५ हजार रुपये एकरी तर धानाला १० हजार रुपये एकरी भरपाई द्यावी, तसेच सोयाबीनला प्रतिक्विंटल ५०० रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

 

 

हजाराच्या स्टॅम्पवर लिहून देताे : मुख्यमंत्री 
मुख्यमंत्री म्हणाले : ‘कर्जमाफीत तुम्ही काय दिले होते, आम्ही काय दिले हे मी दाखवून देईन. कर्जमाफी कोणाला दिली हे मी एक हजाराच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. ही परिस्थिती तुमचेच पाप आहे. त्यामुळे यावर राजकारण करू नका.

 

हेही वाचा, कर्जमाफी, बोंडअळीवरून विधिमंडळात ‘हल्लाबोल’; कामकाज दिवसभरासाठी तहकूब...

बातम्या आणखी आहेत...