आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस उपनिरीक्षकांनी गडचिरोलीत मागितलेल्या विनंती बदल्या अमान्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिरोली आणि गोंदिया या नक्षल प्रभावित जिल्ह्यांत बदली म्हटले की एकेकाळी महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी व शिपायांना घाम फुटायचा. पण आता गडचिरोली परिक्षेत्रात मागितलेल्या विनंती बदल्या चक्क अमान्य करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 


एकेकाळी गडचिरोली व गोंदिया तर दूरच राहो, विदर्भात बदली केली तरी पुण्या-मुंबईकडील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी-कर्मचारी कसेही करून बदली रद्द करून घ्यायचे. त्यातही गडचिरोली व गोंदिया म्हटले की, पुण्या-मुंबईकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घाम फुटायचा. बदली झाली की, वैद्यकीय रजा टाकून रूजू व्हायचे नाही. दरम्यान बदली रद्द करून घ्यायची हे नित्याचेच झाले होते. मुख्यमंत्र्यांनी बदली केल्यानंतरही िवदर्भात रूजू होण्यास अनुत्सूक असणारे कर्मचारी बदली रद्द करण्याची धडपड करीत. पोलिसदलही याला अपवाद नव्हते. दुर्गम भागातील पोलिस ठाण्यांमधील छावणीत वास्तव्यास असलेल्या राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना नक्षलविरोधी अभियानासाठी दूरदूरपर्यंत पायपीट करावी लागते. शिवाय सुट्या मिळत नसल्याने सहा-सहा महिने त्यांना घरी गावाला जाता येत नाही. त्यामुळे ते सतत तणावात असतात. यामुळे येथे येण्यास कोणीच उत्सुक नसतो. पण अलीकडे हे चित्र बदलायला सुरूवात झाली आहे. 


बोरिया व राजाराम खांदलाच्या जंगलात झालेल्या चकमकीत सी-६० पथक व पोलिसांनी ३९ नक्षल्यांना ठार केले. या शिवाय अलीकडच्या काळात सोशल पोलिसिंगमुळे नक्षलवादी शरण येऊन मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत. शिवाय पोलिसांनी नक्षल्यांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने नक्षली बॅकफूटवर गेले आहे. लोक नक्षल्यांच्या विरोधात संघटित होत आहेत. गडचिरोली परिक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी येथे येण्यास उत्सुक असल्याचे गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले. 


बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयातील सुमारे ६४ नि:शस्र पोलिस उपनिरीक्षकांनी गडचिरोलीत विनंती बदली मागितली होती. यात गणेश विठ्ठल शिर्के, विकास आप्पासो कुंडलकर, राजेंद्र भीमराव कुंभार, प्रिया गंगाराम पाटील, तौसिफ रसुल मुल्ला, अमित शिवाजी कुंभार, राहुल पंढरीनाथ खेत्रे, स्मिता अशोक पवार, विश्वजित वसंतराव सरनाईक, भूषण संभाजी पवार आदींचा समावेश आहे. बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयात नि:शस्र पोलीस उपनिरीक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विनंती बदल्या अमान्य करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे पोलिस आस्थापना क्रमांक-२ च्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...