आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन; नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 96 कोटींची पुरवणी मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २६ हजार ४००  कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या साेमवारी विधानसभेत मांडल्या. यात राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १५ हजार कोटींची तरतूद करतानाच नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी ९६ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  

 

नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरवले आहे. यासाठी  चालू वर्षात २८० कोटी रुपयांची तरतूद रेल्वे मंत्रालयाने केली असून राज्याचा हिस्सा म्हणून १२६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. यातील ३० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता पुरवणी मागण्यात ९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

   
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित असल्याने राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांच्या गोंधळात पुरवणी मागण्या सादर केल्या.  पुरवणी मागण्यात रोजगार हमी योजनेसाठी ४०० कोटी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेल्या लंडन येथील निवासस्थानाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात अाली. आदिवासी व अनुसूचित जाती कल्याण योजनांचे दोन हजार कोटी कर्जमाफीसाठी वळवण्यात आले आहेत.

 

सहकार विभागाच्या माध्यमातून १३ हजार कोटींची, तर आदिवासी विकास व अनुसूचित जाती उपाययोजनेतून प्रत्येकी एक हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. 

 

साेयाबीन अनुदानासाठी १०८ काेटींची तरतूद  
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद करताना आदिवासी विकास व अनुसूचित जाती उपाययोजनांचे प्रत्येकी एक हजार कोटी रुपये वळवण्यात आले आहेत.  तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत पूर्ण करण्यात येणाऱ्या सिंचन प्रकल्पांसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याकरिता १०८ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यात करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...