आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जयचंद’च्या शोधात तिने तुडवल्या 110 किमीच्या रानवाटा; ताडोबातील वाघीण पवनी कऱ्हांडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आपल्या साम्राज्य विस्ताराच्या वा जोडीदाराच्या शोधात वाघाने मोठा पल्ला गाठल्याचे नवे नाही. पण वाघाच्या मीलनासाठी आतुर होत त्याच्या सहवासासाठी आपला भाग सोडून वाघिणीने ११० किमीचे अंतर पार केल्याची घटना वन्यप्रेमींसाठी अद्भुत व आश्चर्याची ठरत आहे. या वाघिणीने तब्बल ११० किलोमीटरचे मानवी अडथळे दूर करत आपले बस्तान भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यात मांडले आहे.  

  
जय वाघ बेपत्ता   झाल्यानंतर उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. पण जयचा बछडा जयचंदमुळे पर्यटकांचा ओढा पुन्हा उमरेड-कऱ्हांडलाकडे वाढला आहे. जयचंदचे येथे एका वाघिणीसोबत मिलन झाले. या वाघिणीचा तिच्या चार बछड्यांसोबतचा मुक्त वावर सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. देखणा व तरणाबांड जयचंद वाघ तसेच या वाघिणी आणि बछडे पाहण्यासाठी पर्यटकांची पावले परत एकदा उमरेड-कऱ्हांडलाकडे वळत आहे.     अलीकडच्या काळात या अभयारण्यात जयचंदचे वाढते वर्चस्व पाहून अजून एक अनोळखी वाघीण त्याच्याकडे आकर्षित झाली. 


जयचंदच्या मीलनासाठी उत्सुक ही वाघीण तब्बल ११० किलोमीटरचा प्रवास करत उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात आली आहे. मूलतः चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित होत तिने हा प्रवास केला आहे. याआधी नर  वाघाने आपल्या जोडीदाराचा शोधार्थ प्रवास केले असल्याचे अनेक पुरावे असले तरीही एका वाघिणीने एवढा मोठा प्रवास करणे हे आश्चर्य आहे. 


लावलेल्या कॉलर आयडीद्वारे लक्ष  
या वाघिणीने रेल्वे मार्ग, नदी,  मानवी वस्ती असे अनेक अडथळे दूर करत उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात प्रवेश केला. प्रवेशाचा हा क्षण वन्यजीवप्रेमी  प्रणव जोशी यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (डब्लूआयआय) येथील वाघांच्या अभ्यासासाठी एक नर तसेच मादी वाघिणीला मार्च २०१७ मध्ये कॉलर आयडी लावले होते. त्यातीलच ही वाघीण असून ती स्वतःचा अधिवास तसेच जोडीदार शोधण्याकरिता या अभयारण्यात आली असून वन विभाग तिच्या हालचालींवर नजर ठेवून आहे.  


वाघीण राहील की नाही सांगता येत नाही   
यासंदर्भात उमरेड-कऱ्हांडल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी दादा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या वाघीण फिरत असून ती नक्की येथे थांबेलच याची खात्री देता येत नसल्याचे सांगितले. वाघ वाघिणीला आसरा देतो. पण त्याची वाघीण नव्या वाघिणीला आसरा देईलच याची खात्री देता येत नाही, असे राऊत म्हणाले. वाघ जोडीदाराच्या शोधात खूप दूर जातो. जयदेखील नागझिऱ्यातून उमरेड-कऱ्हांडल्यात आला होता. पण वाघीण जोडीदाराच्या शोधात इतक्या दूर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बातम्या आणखी आहेत...