आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: तुरीपाठोपाठ हरभऱ्याचे भाव पाडून शेतकऱ्यांची लूट सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शासकीय तूर खरेदी सुरू न झाल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दरदिवशी शेतकऱ्यांच्या सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नफ्याची लूट सुरू असताना नवीन हरभऱ्याचेही दर सरासरी हजार रुपयांनी पाडून बाजारात शेतकरी आडवा केला जात असल्याचे चित्र निर्माण झाले. 'गतिमान' सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. परंतु बाजारात ऐन हंगामात 'गतीने' भाव पाडून शेतकऱ्यांच्या पाठीवर मारण्याऐवजी पोटावर मारण्याची परंपरा कायम आहे. 


जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी व संत्रा या प्रमुख पिकांनीच या वर्षी दगा दिल्याने यातून रुपयांचेही उत्पादन होऊ शकले नाही. त्यातच असमाधानकारक स्थिती असलेल्या तूर व हरभऱ्याच्या पिकावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. यंदा विकण्यासाठी काहीच नसल्याने निघालेली तूर व हरभरा सध्या शेतकरी बाजारात विक्रीला घेऊन येत आहे. दोन्ही पिकांचा जेमतेम हंगाम सुरू झाला असतानाही तुरीला हमी भावाच्या तुलनेत हजार ते बाराशे रुपये कमी दराने विकावे लागत आहे. 


त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांंमध्ये शेतकऱ्यांचा दरदिवशी एक कोटी रुपयांचा नफा ओरबाडला जात आहे. दोन आठवड्यांपासून बाजारात नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. परंतु बाजारात हरभऱ्याचेही दर हमी भावाच्या तुलनेत सरासरी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत घसरल्याने हरभऱ्याची गतही तुरी सारखीच झाली. जिल्ह्यात या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने रब्बीत हरभऱ्याची पेरणी केली आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या पेऱ्यात वाढ झाली. या वर्षी शेतकऱ्यांकडे विकण्यासारखी प्रामुख्याने तूर व हरभरा ही दोनच पिके असून तुरी पाठोपाठ हरभऱ्याचेही दर ऐन हंगामाच्या सुरुवातीलाच घसरल्याने शेतकऱ्यांची अवस्था भीषण झाली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ७४८ हरभऱ्याच्या पोत्याची आवक झाली असून किमान ३५००, तर कमाल ३७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. हरभऱ्याला बोनससह ४४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषित करण्यात आला आहे. बाजार समित्यांमध्ये हमी भावाच्या तुलनेत सरासरी किमान हजार रुपये कमी किमतीत तूर व हरभऱ्याची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे दरदिवशी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे दररोज होणारे नुकसान दिसत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 


बाजार समित्यांमध्ये हमीभाव न देण्याचा विक्रम
जिल्ह्यात या वर्षीही दुष्काळी परिस्थिती असल्याने सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर आदी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. शेतकऱ्यांची बाजारात पिळवणूक होऊ नये म्हणून घोषित केलेल्या हमीभावापेक्षा बाजार समित्यांमध्ये शेतमालाची खरेदी होऊ नये असा नियम आहे. हमीभावापेक्षा खरेदी होत असल्यास यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार संचालक मंडळाला दिले. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सर्व बाजार समित्यांमध्ये यंदा सर्वच प्रमुख पिकांना हमीभाव मिळाला नाही. संचालक मंडळात शेतकरी पुत्र असलेल्या संचालकांकडून या अधिकाराचा वापर झाल्याचे दिसत नाही. त्यातच हमीभाव न देणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्याचे सत्ताधाऱ्यांचे आश्वासनही हवेत विरले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न देता आर्थिक उत्पन्न कोणत्या मार्गाने दुप्पट होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. 


सोयाबीनच्या दरवाढीने खरेदीदारांची चंगळ 
बाजारात या वर्षी एेन हंगामात सोयाबीनची सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली होती. परंतु मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून, दर ३३०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. त्यामुळे सरासरी दोन हजार रुपयाने खरेदी केलेल्या सोयाबीन खरेदीदारांना तीन महिन्यांत रग्गड नफा मिळाला आहे. 


नाइलाजाने हरभरा, तुरीची करताहेत विक्री 
या वर्षी प्रथमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकण्यासाठी तूर व हरभऱ्याशिवाय काहीच नसल्याने शेतकऱ्यांच्या अर्थचक्राचे चाक थांबले आहे. भाव घसरल्याने हरभऱ्याची विक्री थांबवून दुसरे पीक विकण्यासाठी नसल्याने शेतकरी नाइलाजाने बाजारात तूर व हरभऱ्याची विक्री करत आहेत. 
तूरही सरासरी ३४५० ते ४२५० रुपयांवर : दवाळमुळे तुरीचे उत्पादन व दर्जा घसरल्याने आधीच शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली. त्यातच तुरीचे दर घसरत असून शासकीय खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...