आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Team's Efforts To Cover Other Differences With The Togadia Shah Dispute

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तोगडिया-शहा वादासह अन्य मतभेदांवर पांघरूण घालण्याचा संघाचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर  संघ परिवारातील स्वदेशी जागरण मंच तसेच भारतीय मजदूर संघाने (भामसं) उघडपणे व्यक्त केलेली नाराजी तसेच िवहिंपचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारविरुद्ध केलेल्या थेट आरोपांमुळे उडालेला धुरळा संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी रविवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत काहीसा खाली बसला. या विषयावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. एकाच कुटुंबातील सारे भाऊ एकसारख्या स्वभावाचे कसे असतील, असा प्रश्न करीत भावांमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत, असे सावरून घेतले. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याला अनुसरूनच संबंधित व्यक्त झाले, असे जोशी यांनी स्पष्ट केले.  

 

वादग्रस्त प्रकरणे नेमकी कोणती?

भाजप सरकारविरोधातच संबंधीत संघटनांची निदर्शने  
गेल्या काही दिवसांपासून संघ परिवारातील भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच तसेच विहिंपमधील मतभेदांचे जाहीर प्रदर्शन झाले. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात कामगारांविषयी काहीच नसल्याने नाराज भारतीय मजदूर संघाने शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. मात्र नागपुरात दबावामुळे निदर्शने टाळून फक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नाेटाबंदी, जीएसटी आणि बँक व्यवहाराच्या डिजिटलायझेशनमुळे सरकारची तिजोरी तुडुंब भरलेली असताना सरकारने कामगारांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भारतीय मजदूर संघाने उघड नाराजी व्यक्त केली होती. 

 

तोगडियांचा स्वकीयांवरच हत्येच्या प्रयत्नाचा आरोप  
विहिंपचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी थेट मोदींविरुद्ध जाहीर नाराजी व्यक्त करीत आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. पत्रपरिषदेत त्यांना रडू कोसळले होते. दुसऱ्या घटनेत बुधवार ७ मार्च रोजी तोगडिया यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अपघात झाला होता. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. एका ट्रकने त्यांच्या बुलेटप्रूफ गाडीला मागच्या बाजूने धडक दिली. यावर प्रतिनिधी सभेला उपस्थित राहण्यासाठी आले असताना आपल्या गाडीवर ट्रक चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला.