आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- वैद्यकीय अभ्यासक्रमात शरीराच्या प्रत्येक अवयवावर पदवी व पदविका अभ्यासक्रम आहेत, पण झोपेवर कोणताही अभ्यासक्रम नव्हता. नागपूर येथील प्रख्यात निद्रा तज्ज्ञ डाॅ. सुशांत मेश्राम यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला नव्या अभ्यासक्रमाचा प्रस्ताव दिला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) हा अभ्यासक्रम सुरू होत असल्याची माहिती डाॅ. मेश्राम यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमाचे नाव “फेलोशिप इन स्लिप मेडिसिन’ असे असून यामध्ये एमडीनंतर प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे झोप आणि झोपेशी संबंधित विविध आजारांवर संशोधन करणे सहज शक्य होणार आहे.
फेसबुक घातक
तरुणाई रात्री उशिरापर्यंत सोशल नेटवर्किंग साइट्सवर चॅटिंग करते. रात्री १२ ते ३ ही महत्त्वाची वेळ असताना तरुण जागरण करतात. यामुळे गाढ झोप न झाल्यामुळे विविध आजार उद््भवू शकतात, असे डाॅ. मेश्राम यांनी सांगितले.
रेम अवस्था महत्त्वाची
झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम नावाची अवस्था सर्वात महत्त्वाची आहे. १, २, ३ आणि रेम मिळून झोपेची एक सायकल तयार होते. रेम अवस्थेत मेंदूतील पेशी सक्रिय होऊन मेंदूतील बिघाडाची दुरुस्ती करतात. शांत झोप महत्त्वाची आहे.
घोरण्यावर उपाय
प्रत्येकाचे घोरणे वेगळे असते. घोरण्याच्या निरनिराळ्या प्रकारानुसार त्यावर उपाय केले जातात. सौम्य वा मध्यम घोरण्यावर उपाय म्हणून तोंडात सहज लावता येण्यासारखे डेंटल अप्लायन्सेस आहे. ते तयार करून घेता येतात.
किमान आठ तास झोपा
वर्ल्ड स्लिप सोसायटीने यावर्षी शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी व कामगारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दीर्घायु व्हायचे असेल तर सर्वसाधारण व्यक्तीसाठी किमान सात ते आठ आणि ५० वर्षांवरील व्यक्तीसाठी ७ ते ७.३० तास गाढ झोप आवश्यक आहे, असे डाॅ. मेश्राम यांनी सांगितले. सात-आठ तासांपेक्षा आठवडाभर एक तास कमी झोप झाली तर शरीरातील ७०० जनुके कमी होतात. या अभ्यासक्रमात अशा विविध गोष्टींवर संशोधन करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.