आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीच्या प्रशिक्षणाची गरज 'वनामती' पूर्ण करेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- 'कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता 'वनामती' ही संस्था पूर्ण करेल,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात बोलताना व्यक्त केला. वनामती संस्थेतील वसंतराव नाईक स्मृती सभागृहाचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, खासदार अनिल महात्मे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वनामतीच्या माध्यमातून कृषीविषयक व प्रशासकीय बाबींचे प्रशिक्षण विविध गटांना देण्यात येते. 


सर्वात जास्त प्रशिक्षणाची आवश्यकता कृषी क्षेत्राला असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वातावरणाच्या बदलाने कृषी क्षेत्रात स्थित्यंतरे येत आहेत. जोपर्यंत कृषी क्षेत्राला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्राला स्थैर्य प्राप्त होणार नाही. हवामानाचा वेध, जमीन तसेच पाण्याचे परीक्षण यासारख्या बाबींचे योग्य प्रशिक्षण दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल. विदर्भाचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दूरदृष्टीने शेती व जलसंधारण क्षेत्रात बहुमोल कार्य केले. मात्र, त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. राज्याला मोठ्या धरणापेक्षा जलसंधारणाची गरज आहे. ही संकल्पना वसंतराव नाईक यांनी त्याकाळी रुजवली होती. दूरदृष्टी ठेवून त्यांनी जनसामान्यांकरिता कार्य केले. 'महाराष्ट्राला मी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवेल', अशी गर्जना करणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या नावाने हे सभागृह आहे, ही बाब समाधानाची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, कृषी सहाय्यकांनी तयार केलेल्या 'कृषी मोबाइल ॲप'चे प्रकाशनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

बातम्या आणखी आहेत...