आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- राज्यातील सुमारे ९२२ गावांत गंभीर पाणी संकट निर्माण झाले असून या गावातील पाणी पातळी ३ मीटरपेक्षाही खाली म्हणजे धोकादायक स्थितीत गेली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा वर्षातून चार वेळा सर्वेक्षण करते. विभागाच्या निरीक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीच्या नोंदी दरवर्षी सप्टेंबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यात घेण्यात येतात. यावर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या नोंदीतच भूजल पातळी खालावल्याने बहुतांश ठिकाणच्या विहिरी व कूपनलिका कोरड्या पडण्याच्या घटना घडत आहेत. निरीक्षण विहिरीच्या भूजल पातळीच्या अभ्यासावरून राज्यातील ९२२ गावात एप्रिल २०१८ ते जून २०१८ पर्यंत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
२० टक्के कमी पाऊस आणि भूजल पातळी घटल्यामुळे ९२२ गावांतील पाणी पातळी ३ मीटरपेक्षा कमी, १८८७ गावांतील भूजल पातळी २ ते ३ मीटरपेक्षा कमी आणि ४४४७ गावांतील भूजल पातळी १ ते २ मीटरपेक्षा कमी झाली आहे. राज्यात एकूण ७२५६ गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ४ तालुके, अमरावती जिल्ह्यातील १३, बुलडाणा : ३, चंद्रपूर : १४, गडचिरोली : ६, गोंदिया : ८, नागपूर २, वर्धा : ३ वाशीम : ४ व यवतमाळ जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा समावेश आहे.
चार जिल्ह्यांत मिश्रित पाणी
संपूर्ण राज्यात पूर्व विदर्भात फ्लोराइडमिश्रित पाण्याची समस्या आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात फ्लोराइडमिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यात फ्लोराइडचे प्रमाण १.४ पीपीएमपेक्षा जास्त असल्यास आरोग्याला धोका असतो. नागपूर जिल्ह्यांत भिवापूर, पारशिवनी, कुही आणि रामटेक हे तालुके, चंद्रपूर जिल्ह्यांत वरोरा, चिमूर, राजूरा अाणि कोरपना, गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, अहेरी व सिरोंचा, तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये फ्लोराइडमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मराठवाड्यातील २२ गावांमध्ये टंचाई
औरंगाबाद जिल्ह्यातील ३ तालुके, हिंगोली : ४, जळगाव : १०, कोल्हापूर व लातूर जिल्हा प्रत्येकी १, नांदेड : १४, नंदुरबार व नाशिक जिल्हा प्रत्येकी १, परभणी जिल्हा ७ तसेच सोलापूर जिल्ह्यातील ४ तालुक्यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.