आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षली गरिबांना मारतात तेव्हा तुम्ही कुठे असता? पीडितांचा सत्यशोधन समितीला सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर -  बोरिया व राजाराम खांदलाच्या जंगलात चकमकीत पोलिसांनी ३९ नक्षल्यांना टिपले. याच्या चौकशीस गगेलेल्या मानवाधिकार सत्यशोधन समितीला नक्षल पीडितांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. अनपेक्षित विरोध व नक्षलपीडितांनी मानवाधिकार सत्यशोधन समितीला केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीसमोर सत्यशोधन समिती सदस्य निरुत्तर हाेऊन निघून गेले.  


नक्षलपीडित संघटनेने समितीला चांगलेच धारेवर धरले. आतापर्यंत कधीही असे झाले नव्हते. त्यामुळे समिती सदस्य गडबडले. नक्षलवादी आमच्या घरातील निष्पाप सदस्य मारत होते, तेव्हा तुम्ही कुठे होता? चकमकीत नक्षली मारले गेले की तुम्ही सत्य शोधण्यासाठी येता. मग नक्षली गरीब व निष्पाप आदिवासींना, गावकऱ्यांना मारतात, त्या वेळी तुम्ही कुठे जाता? हे व असे अनेक प्रश्न उपस्थित करत संघटनेने बॅनर लावून समितीचा निषेध केला.

 

नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या ठरवून मारलेल्या आदिवासींच्या कुटुंबीयांनी निषेधाचे फलक घेऊन नारेबाजी केली.   ही चकमक बनावट असल्याचा कांगावा करत नक्षलींनी गडचिरोलीत पत्रके टाकली होती. चकमकीनंतर तेलंगण दंडकारण्यातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सत्य शोधण्यासाठी गडचिरोलीत येण्याची घोषणा केली. ४० जणांची समिती शनिवारी येथे आली. त्यात डाव्या विचारसरणीचे अभ्यासक, वकील, प्राध्यापक, कार्यकर्त्यांचा समावेश होता. रविवारी समितीने गडचिरोलीसह इतर ठिकाणी भेटी दिल्या. बोरियात त्यांना नक्षलपीडित संघटनेच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

 

न्याय मिळवून द्या  
नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या समजून आमच्या घरातील सदस्यांना मारले. आम्हाला आमचे गाव, घर, जमीन, शेतीवाडी सोडून यावे लागले. त्या वेळी आमच्या मदतीसाठी कोणीच आले नाही. सत्यशोधन समितीने आमच्यावरील अन्यायाला वाचा फोडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नक्षलपीडित संघटनेने निवेदनातून केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...