आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरुड - अमरावती-पांढुर्णा महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करताना एच. जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ट्रकने मागून दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी असल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. पांढूर्णा मार्गावर धनोडीजवळ ही घटना घडली. सिद्धार्थ काशीराव रामटेके (३५) रा. हातुर्णा व मोरेश्वर रामराव शेरेकर (४५) रा. वाठोडा (चांदस) अशी मृतांची नावे असून दिनेश रामभाऊ कुऱ्हाडे (४३)रा. शेंदुरजना घाट असे जखमीचे नाव आहे.
अमरावती-पांढुर्णा या महामार्गाचे काम सुरू असून त्याचे कंत्राट एच. जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिलाा. रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी कंपनीचे ट्रक धावत आहेत. घटनेच्या वेळी कंपनीचा ट्रक (आरजे १४/ जी २६१५) हा गौण खनिज घेऊन जात होता. दरम्यान त्याच वेळी सिद्धार्थ काशीराव रामटेके व मोरेश्वर रामराव शेरेकर,दिनेश रामभाऊ कुऱ्हाडे हे दुचाकीने (एमएच २७/ सीई २५२९) पुसल्यावरून वरुडकडे जात होते. धानाेडीजवळ मागून आलेल्या कंपनीच्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुचाकीसह दरीत कोसळला. दुचाकीवरील तिघेही ट्रकमध्ये अडकले होते. दरम्यान याबाबत माहिती मिळताच धनोडी, पुसला, शंेदुरजनाघाट व वरुड येथील नागरिकांनी घटनास्थळ धाव घेतली. शेंदुरजना घाट पोलिसांनाही घटनेबाबत माहिती दिली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. प्रमोद पोतदार यांनी उपचाराअंती सिद्धार्थ रामटेके व मोरेश्वर शेरेकर यांना मृत घोषित केले. जखमी दिनेशला उपचारासाठी नागपूर मेडिकलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान कंपनीच्या ट्रकचालकांच्या अरेरावीने त्रस्त नागरिकांनी एच. जी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी केली. पोलिसांनी ट्रकचालक राधे बन्सपती यादव (२३) रा. बहेरी जि. सीद्दी (मध्यप्रदेश) याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला पुढील तपास ठाणेदार शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आशिष गंद्रे करीत आहे.
मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आश्वासन: या अपघातानंतर मृतकांच्या परिवाराचे काय असा प्रश्न निर्माण झाला असता, बेनोडा शहीद सर्कलचे जि. प. सदस्य देवेंद्र भुयार यांनी मृतकाच्या परिवाराला दहा लाखाची, जखमीच्या परिवाराला पाच लाखांची मदत जाहीर करा, अन्यथा आंदोलन करू असा आक्रमक पावित्रा घेतला असता प्रशासनातर्फे मदतीचे आश्वासन देण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.