आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाख 18 हजार शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याची नवी योजना 15 दिवसांत: ऊर्जामंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यात २ लाख १८ हजार शेतकऱ्यांना विजेचे नवीन कनेक्शन देणारी योजना येत्या १५ दिवसांत जाहीर होणार आहे. या योजनेत दोन शेतकऱ्यांमागे एक ट्रान्सफॉर्मर दिला जाईल आणि त्याचा खर्च राज्य सरकार करेल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.   सत्तारूढ पक्षाने आणलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर बावनकुळे उत्तर देत होते. ते म्हणाले, राज्याची वीज बिलापोटीची एकूण थकबाकीची रक्कम ३५ हजार कोटींवर गेली. त्यापैकी शेतीच्या वीज कनेक्शनची थकबाकी २२ हजार ४३ कोटी रुपयांची असून नळ योजनांचे १ हजार ५५९ कोटी, तर रस्त्यांवरील सार्वजनिक वीज व्यवस्थेचे ३ हजार २४० कोटी रुपये थकीत आहेत. शेती वीज बिलाच्या थकबाकीमध्ये विदर्भाची ४ हजार ९०७, तर मराठवाड्याची थकबाकी १ हजार ९७३ कोटींची आहे. थकबाकीमध्ये राज्यात नगर जिल्हा आघाडीवर आहे.  राज्य शासनाने आजवर सक्तीची वीज बिल वसुली केली नाही याकडे लक्ष वेधून बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य शासनाने सुमारे ८ हजार कोटींचे व्याज व दंडमाफीची योजना लागू केली आहे.

 

दोन वर्षांत शेतकऱ्यांना थकबाकी भरावयाची आहे. राज्यातील वीज यंत्रणा सुदृढ करण्यासाठी ३० हजार कोटींची गरज भासणार आहे.  नव्या सरकारच्या तीन वर्षांच्या काळात सुमारे साडेचार लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात आले असून त्यात विदर्भ व मराठवाड्यातील अनुशेषग्रस्त जिल्ह्यांचा अनुशेष पूर्ण करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा कृषी पंप कनेक्शनचा अनुशेष राहिला असल्याची माहिती त्यांनी दिली.    


दहा वर्षांत ४० लाख शेतकरी सौरऊर्जेवर    
येत्या १० वर्षांत ४० लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर आणण्याची योजना सुरू आहे. त्यात २ वर्षांत ५ लाख सौरपंपांचे लक्ष्य ठेवले जाईल. यात राज्यातील सर्व शाळा, नळ योजना, अंगणवाड्या सौरऊर्जेवर आणण्याचे नियोजन असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...