आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र आरक्षणाची मुस्लिम समाजाला गरज नाही; अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मुस्लिम समाजातील आर्थिक मागास जाती समूहांना मंडल आयोगाने इतर मागासवर्ग वर्गवारीत आधीच केंद्रीय आरक्षणाचा लाभ दिला आहे, मुस्लिम जाती त्याचा लाभही घेत आहेत. त्यामुळे मुस्लिमांना पुन्हा स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही, असे अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडेंनी म्हटले आहे.  


काँग्रेसचे संजय दत्त, हुस्नबानू खलिफे, शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी त्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील मुस्लिम समाजाला शासकीय सेवा व शैक्षणिक सुविधांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश यापूर्वीच्या सरकारने काढला होता. मात्र, २३ डिसेंबर २०१४ पर्यंत अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने तो व्यपगत झाला. मुस्लिम समाजासंदर्भातील सच्चर समिती अहवालाची पार्श्वभूमी निव्वळ धार्मिक स्वरूपाची आहे. त्या अहवालाच्या आधारे आरक्षण देणे शक्य नाही. मुस्लिम समाज आर्थिक मागास आहे, असे सिद्ध करणारी आकडेवारी राज्याकडे आजमितीस नाही. त्यामुळे आरक्षणाच्या अध्यादेशाचे सरकारने कायद्यात रूपांतर केले नाही, असे तावडे म्हणाले.  


 मराठा समाजाची आकडेवारी तरी कुठे होती? मग, मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर कसे केले, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी ओबीसी वर्गवारीत मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण स्वतंत्रपणे देण्याची मागणी केली. ख्वाजा बेग यांनी राज्य सरकार प्रत्येक अधिवेशनात मुस्लिम आरक्षणप्रश्नी तेच ते उत्तर देत असल्याचा आरोप केला. हुस्नबानू खलिफे यांनी आरक्षणप्रश्नी सरकारच्या भूमिकेवर मुस्लिम समाज व्यथित झाला असल्याचे नमूद केले. रणपिसे यांनी अध्यादेश व्यपगत करून सरकारने न्यायालयाचासुद्धा अवमान केल्याचा दावा केला.   


सुमारे २० मिनिटे तारांकित प्रश्न चालला. परंतु विरोधी बाकावरील सदस्यांचे मंत्री तावडे यांच्या उत्तराने समाधान होत नव्हते. शेवटी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हस्तक्षेप केला. याप्रश्नी माझ्या दालनात बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये सरकारने दिलेले आश्वासन तपासून पाहण्यात येईल, असे सांगून त्यावर पडदा टाकला. तरीसुद्धा विरोधकांचे समाधान झाले नाही, विरोधी बाकावरील सर्वपक्षीय सदस्यांनी सभात्याग करत फडणवीस सरकारच्या मुस्लिम आरक्षणविरोधी भूमिकेचा जोरदार निषेध केला.

बातम्या आणखी आहेत...