आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही, मोबाइल, इंटरनेटचे ‘व्यसन’ साेडवण्याचा वसा; राज्यातील 40 हजार मुलांचे समुपदेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सध्याच्या काळात टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटचे लोकांना जणू व्यसनच जडले आहे. या भौतिक वस्तूंच्या जाळ्यातून बालकांना बाहेर काढण्यासाठी जळगाव येथील कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे यांनी टीव्ही, इंटरनेट, मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र सुरू करत आतापर्यंत सुमारे ४० हजार मुलांचे समुपदेशन केले आहे. गोरडे यांनी अभियानाचा कार्यकर्ते जोडून संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करण्याचा मनोदय “दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.     


गोरडे हे “टीव्ही व सोशल मीडिया’ या विषयावर जनजागृती करण्याचे काम गेल्या १० वर्षांपासून करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत ३ लाख माहितीपत्रकांचे वाटप केले असून सुमारे ४०,००० हून अधिक बालकांचे सामूहिक समुपदेशनही केले आहे. सुमारे २५०० व्याख्याने दिली आहेत. टीव्ही, मोबाइल, इंटरनेट, व्हाॅट्सअॅप, फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे “या टीव्हीचं काय करायचं?’ हे पुस्तकही त्यांनी  लिहिले आहे. या पुस्तकाच्या लाखभर प्रती आतापर्यंत त्यांनी वितरित केल्या आहेत.    


एक दिवस करा ‘डिजिटल उपवास’
टीव्ही, इंटरनेट व मोबाइल शिस्त अभियानामुळे घराघरातील सुसंवाद परत सुरू झाला. एकत्र जेवणे, फिरायला जाणे सुरू झाले. अनेक कुटुंबांत आठवड्यातून एकदा टीव्ही पाहणे सुरू झाले. आठवड्यातून एक दिवस टीव्ही, इंटरनेट व मोबाइल बंद ठेवून डिजिटल उपवास करण्याची जोड अभियानाला दिली. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गोरडे यांनी सांगितले. आता कोणते कार्यक्रम पाहायचे याचे वेळापत्रक अनेक कुटुंबांत ठरलेले आहे.   


टीव्ही, सोशल मीडियाच्या नादात २० वर्षे वाया
एक व्यक्ती रोज सरासरी ४ तास तरी टीव्ही किंवा सोशल मीडियावर घालवते. याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास, तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७,६०० तास यावरच खर्च होता. अर्थात यातून आपल्या आयुष्यातील २० वर्षे अक्षरश: वाया जातात, असे गोरडे म्हणाले. भारतातील ४ ते १४ वर्षांची मुले दिवसाला सुमारे ३ तास टीव्ही पाहतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे सुमारे साडेतीन तास टीव्ही पाहतात, असा गाेरडेंचा निष्कर्ष आहे.


विद्यार्थी, पालकांसाठी पुरस्कार
स्वत:ला टीव्ही, इंटरनेट, मोबाइलच्या व्यसनापासून दूर ठेवणाऱ्या विद्यार्थी, पालकांना ते “टीव्ही शिस्त’ पुरस्कार वितरित करतात. टीव्ही, मोबाइल, इंटरनेट व सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही, मोबाइल, इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्हीला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू केले. त्यासोबतच विज्ञान प्रकल्प, बौद्धिक खेळणी, सीडी, पुस्तके, सहली आदी उपक्रम सुरू केले आहे. या सर्व उपक्रमांना विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे गोरडे यांनी सांगितले.    

बातम्या आणखी आहेत...