आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांनंतर पुरवठा सुरू झाला तरीही अर्धे शहर पाण्यापासून वंचित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सिंभोरा येथून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नांदगाव पेठजवळ फुटल्यामुळे गेले तीन दिवस शहराला पाणीच मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले. गुरुवार (दि.७ जून) तीन दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला तरी अर्धे शहर पाण्यापासून वंचित राहिले. खोलगट भागात प्रथम पाणी पोहोचल्याने तेथील नागरिकांचा जीव नळाला आलेले पाणी बघून भांड्यात पडला. मात्र उर्वरित अर्ध्या शहरवासीयांना शुक्रवारपर्यंत (दि.८ जून)पाण्यासाठी वाट बघणे क्रमप्राप्त आहे. 

 

नागरिकांना पाण्यासाठी शहरात गेले तीन दिवस अग्निपरीक्षा द्यावी लागली. पाण्यासाठी वणवण भटकून विहिरींवर पाणी भरण्यासोबतच पाण्याच्या कॅनही खरेदी कराव्या लागल्या. काहींनी पिण्याचे पाणी जपून वापरले तरी त्याला मर्यादा होत्या. प्रचंड उकाडयात कसेबसे तीन दिवस काढावे लागले. तरीही पूर्ण शहराला एकाचवेळी पाणी मिळाले नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये मजीप्राबद्दल चांगलाच रोष दिसून आला. 

 

गुरुवारी सकाळी १०.३० पासून चारही पंप सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरातील मालटेकडी, नागपुरी गेट, खोलापुरी गेट, इतवारी, पन्नालालनगर, एचव्हीपीएम परिसर, गणेश काॅलनी, प्रभात काॅलनी परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला तरी तो पूर्ण दाबाने नव्हता. करंगळीपेक्षाही लहान धार असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. अनेकजण पंपाने पाणी ओढतात त्यांच्याविरुद्ध मजीप्रा कारवाई करीत नसल्याबद्दलही नागरिकांनी संताप व्यक्त केला.


 
शहरातील पूर्ण जलवाहिन्यांमधील पाणी एकतर ओढून घेण्यात आले किंवा त्यात जे पाणी जमा होते ते लिकेजद्वारे जमितीत झिरपले. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर आधी या जलवाहिन्या पूर्ण भरणे आवश्यक आहे. त्यानंतरच नळाला पाणी येईल, असेही मजीप्राद्वारे सांगण्यात आले. 

 

अशा घटना घडतच असतात हा रखरखावाचा एक भाग आहे. विशेषत: उन्हाळ्यात अशा घटना घडल्या की त्याची तीव्रता वाढते. आम्हाला नागरिकांच्या त्रासाची जाणीव आहे. त्यामुळे मजीप्राने शक्य तेवढ्या लवकर फुटलेला सिमेंट पाईप काढून त्या जागी लोखंडी पाईप बसविला, असेही मजीप्राच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले. 

 

मुख्य जलवाहिनी जुनी झाल्याने फुटली : मुख्य जलवाहिनी जुनी झाली आहे. त्यातच वीज पुरवठाही खंडित झाला होता. वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर एकाचवेळी ७५० अश्वशक्तीचे चारही पंप सुरू झाले. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवर दबाव वाढला. तसेच खोलगट भागात असलेली मुख्य जलवाहिनी फुटली. ही मुख्य जलवाहिनी २५ वर्षे जुनी झाली आहे. जेथे सिमेंटची जलवाहिनी फुटते तेथे आम्ही लोखंडी जलवाहिनी टाकत आहोत. पाच मीटर लांबीची ही लोखंडी जलवाहिनी वेल्डिंगद्वारे जोडण्यासाठी मजूर मिळत नाहीत. आम्हाला गोंदिया जिल्ह्यातून मजूर आणवा लागला, असे मजीप्राद्वारे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...