आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पुन्हा दूर ठेवत काँग्रेसने भाजपच्या साथीने अध्यक्षपद पटकावले तर उपाध्यक्ष पदावर भाजपला संधी मिळाली. भंडारा जिल्हा परिषदेत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी कायम राहिली.
भंडारा जिल्हा परिषदेत यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशीच आघाडी होती. यावेळीही दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येत अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद पटकावले. अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश डोंगरेे तर राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर यांची उपाध्यक्ष पदावर निवड झाली. डोंगरे यांनी ३९ मते मिळवत भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार नेपालचंद्र रंगारी यांचा पराभव केला तर कुर्झेकर यांनीही ३९ मते घेत भाजपच्या निलिमा इलमे यांचा पराभव केला. रंगारी आणि इलमे यांना प्रत्येकी १२ मते मिळाली. भाजपच्या एका सदस्याने तटस्थ भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. ५२ सदस्य असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे सर्वाधिक १९ जागा आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे १५ आणि भाजपकडे १३ जागा आहेत. चार अपक्ष असून शिवसेनेकडे एक जागा आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र काँग्रेसने यंदाही राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला सारत भाजपच्या साथीने अध्यक्षपद मिळवले तर भाजपला उपाध्यक्ष पदावर संधी मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सीमा मडावी यांनी ३३ मते घेऊन राष्ट्रवादीच्या प्रतिस्पर्धी सुनीता मडावी यांचा पराभव केला. सुनीता मडावी यांना केवळ राष्ट्रवादीचीच २० मते मिळाली. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे हमीद अल्ताफ अकबर अली यांनी ३३ मते मिळवत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर यांचा पराभव केला. परशुरामकर यांना केवळ २० मते मिळाली. गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील संघर्षामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव नाकारत पुन्हा भाजपला जवळ केले. ५३ सदस्यांच्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे १६ तर भाजपकडे १७ जागा आहेत तर राष्ट्रवादीकडे सर्वाधिक २० जागा आहेत, हे विशेष.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.