आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचएमटीसह तांदळाच्या नऊ वाणांचे कृषी संशोधक दादाजी खोब्रागडे देत आहेत आजाराशी लढा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- एचएमटीसह नऊ तांदळाच्या वाणांचे संशोधक म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे आजाराशी सामना करत आहेत. शासनाने उपचारासाठी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. दादाजी खोब्रागडे यांना अर्धांगवायू झाला आहे. ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादाजींशी व्यक्तिगत स्नेहाचे संबंध असलेले आमदार डाॅ. मिलिंद माने यांच्याशी संपर्क साधला असता आपण दादाजींच्या कुटुंबीयांना व्यक्तिगत तसेच शासकीय मदत मिळवून देऊ, असे सांगितले. 


सर्वप्रथम १९८३ मध्ये ते तांदळाचे संशोधक म्हणून समोर आले. त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता तिसरीपर्यंत झाले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. मात्र त्यांनी आपल्या शेतात धान पीक लावून त्यावर संशोधन केले. एचएमटीसारख्या वाणाची निर्मिती करणाऱ्या या कृषीतज्ज्ञाचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. सरकार आणि समाजालाही या संशोधकाची आठवण राहिलेली नाही. शरद पवारांपासून ते डॉ. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांना सन्मानित केले आहे. परंतु मान-सन्मानांनी पोट भरत नाही, या वास्तवाचा अनुभव दादाजींचे कुटुंबीय घेत आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनावर अनेक लोक श्रीमंत झाले; पण दादाजींची परिस्थिती आहे तशीच आहे. एक मुलगा, सून, तीन नातवंडे, असा त्यांचा परिवार आजही मोलमजुरी करूनच जगतोे. दीड एकर शेतीत त्यांनी धानपिकाचे यशस्वी प्रयोग केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते. ५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. या धान संशोधकाला तीन वर्षांपूर्वी अर्धांग वायूने ग्रासले. तीन वर्षांपासून ते अंथरुणावर खिळले आहेत. ब्रह्मपुरीचे तहसीलदार समीर माने यांनी शासकीय मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याची माहिती त्यांचे नातू दीपक खोब्रागडे यांनी दिली. 


आतापर्यंत तांदळाची नऊ वाणे केली विकसित 
दादाजींच्या नावावर धानाची ९ वाण विकसित करण्याचा विक्रम आहे. त्यांनी विकसित केलेली धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते. एचएमटी, विजय नांदेड, नांदेड-९२, नांदेड-हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड-दीपक, काटे-एचएमटी आणि डीआरके-टू हे नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...