आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरोंचापाठोपाठ अहेरी तालुक्याचीही नक्षलमुक्तीकडे वाटचाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भामरागड तालुक्यातील कसनासूर आणि बोरियाच्या जंगलात संपूर्ण नक्षलवादी दलमचा सफाया केल्यावर सिरोंचा पाठोपाठ अहेरी तालुका देखील नक्षलमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा नक्षल विरोधी अभियानाकडून सुरु झाला आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली, भामरागड, धानोरा आणि कोरची या चार तालुक्यांमध्ये आजही नक्षलवाद्यांचाच बोलबाला असून या चारही तालुक्यात सुरक्षा दलांचा प्रभाव कशा पद्धतीने वाढविता येईल, या दिशेने नक्षल विरोधी अभियानाचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती अभियानातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. 


रविवारी सकाळी सी-६० आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या संयुक्त कारवाईतून १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. जखमींना घेऊन जाण्याची नक्षलवाद्यांची पद्धत लक्षात घेता मृतांचा आकडा आणखी असलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गडचिरोलीतील मागील चार दशकातील सर्वात मोठे यश असल्याचे मानले जाते. या सोळा नक्षलवाद्यांवर असलेल्या बक्षिसांची रक्कम दीड कोटीपेक्षा अधिक होती, अशी माहिती देताना सिरोंचा तालुक्याच्या पाठोपाठ आता अहेरी तालुका देखील नक्षलमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिव्य मराठी शी बोलताना केला. 


एटापल्ली, भामरागड, धानोरा आणि कोरची हे चार तालुके आजही मोठ्या प्रमाणात नक्षल कारवायांनी प्रभावित तालुके मानले जातात. या चार तालुक्यांमध्ये येत्या काही महिन्यात सुरक्षा दलांचा एरिया डॉमिनन्स कशा पद्धतीने वाढविता येईल, यासाठी अभियानाकडून डावपेच आखले जात आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 


साईनाथ आणि सिनू हे कुख्यात नक्षलवादी ठार 
रविवारच्या चकमकीत ठार झालेला नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य आणि पेरिमिली दलमचा कमांडर साईनाथ उर्फ डोलेश माडी आत्राम (वय ३६) आणि दक्षिण गडचिरोलीचा विभागीय सचिव तसेच कंपनी कमांडर सिनू उर्फ श्रीकांत उर्फ विजेंद्र नरसिम्हालू राऊथू (वय ५१) हे कुख्यात नक्षलवादी ठार झाल्याने नक्षल विरोधी अभियानाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. अहेरी तालुक्यातील रहिवासी असलेला साईनाथ २००४ मध्ये चळवळीत सहभागी झाला होता. पेरिमिली दलमची उपकमांडर असलेली त्याची पत्नी सरिता उर्फ केका कोलू कोवाची ही गेल्यावर्षी १९ एप्रिल रोजी ताडगाव परिसरातील बांडेनगर जंगलातील चकमकीत ठार झाली. तर पायाला गोळी लागल्याने साईनाथ जखमी होऊन काही प्रमाणात अधु झाला होता. बरोबर वर्षभरानंतर साईनाथही पोलिस कारवाईत मारला गेला. त्याच्यावर खून, स्फोट, अपहरण, जाळपोळीसह ७५ गुन्हे दाखल होते, अशी माहिती अभियानातील सूत्रांनी दिली. नक्षल कमांडर सिनूवर अशाच स्वरुपाचे ८२ गुन्हे दाखल होते. तो २००३ मध्ये नक्षल चळवळीत सहभागी झाला होता. चळवळीतच त्याचा दीपा नावाच्या महिला नक्षलवाद्याशी विवाह झाला होता. मात्र, २००९ मध्ये दीपाने नक्षलवाद्यांच्या निधीतील ३० ते ३५ लाख रुपये पळवून तत्कालीन आंध्र प्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. नक्षल नेत्यांचा सिनूवर संशय निर्माण झाल्याने त्याला त्यावेळी कंपनी क्रमांक १० मध्ये पाठविले गेले होते. 

बातम्या आणखी आहेत...