आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरे तस्करी करणारा ट्रक पेटला; ३० जनावरांचा होरपळून झाला मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ/ पाटणबोरी- जिल्ह्यातील रस्त्यांवरून होणारी जनावरांची तस्करी आता गंभीर स्वरूप धारण करु लागली आहे. अशाच प्रकारची जनावरांची तस्करी करणारा भरधाव ट्रक सिमेंटच्या बॅरिकेडवर आदळून पलटी झाला. त्यानंतर त्या ट्रकने अचानक पेट घेतला. त्यात त्या ट्रकमध्ये कोंबून असलेल्या तब्बल ३० जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना यवतमाळ-आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या पिंपळखुटी चेकपोस्टजवळ बुधवारी मध्यरात्री घडली. 


राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केल्यापासून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी करण्यात येत आहे. त्यातच जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यात गोवंश हत्या बंदी नसल्याने त्या ठिकाणी कत्तलीसाठी जनावरांची तस्करी करण्यात येते. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. पोलिसांकडून या संदर्भात वारंवार करण्यात येणाऱ्या कारवाई आणि त्यात जप्त करण्यात येणारी जनावरे यांची संख्या पाहता ही बाब सिद्ध होते. मात्र असे असतानाही दररोज मोठ्या प्रमाणात जनावरे भरलेली वाहने जिल्ह्यातील रस्त्यांचा वापर करुन सीमा पार करत आहेत. त्यातच बुधवारी रात्री अशाच प्रकारची जनावरे भरलेली वाहने येणार असल्याची माहिती पाटण पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पाटणचे ठाणेदार शिवाजी लष्करे यांनी सीमेलगत असलेल्या दिग्रस येथे सापळा रचला होता. मात्र या सापळ्याची माहिती जनावरे तस्करी करणाऱ्या वाहनांना मिळताच त्यांनी आपली वाहने पाटणबोरी मार्गे पिंपळखुटी चेकपोस्टकडे वळवली. याची माहिती ठाणेदार शिवाजी लष्करे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या पथकासह या वाहनांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान या वाहनांपैकी ट्रक क्रमांक एमपी १९ एचए ०७१९ हा भरधाव पिंपळखुटी चेकपोस्टकडे निघाला. या ठिकाणी सिमेंटचे मोठमोठे बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत. ट्रकचालकाने हे प्लास्टिकचे बॅरिगेड्स समजून ट्रक थेट त्या बॅरिगेड्सवर चढवला. यात अपघात होऊन त्या ट्रकची डिझेल टाकी फुटून ट्रकने पेट घेतला. यावेळी वाहनातील आरोपींनी त्या ठिकाणावरून पळ काढला. मात्र ट्रकमध्ये कोंबून असलेल्या ३० जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा एसडीपीओ अमीत कोठी, ठाणेदार असलम खान, शिवाजी लष्करे हजर झाले. 


रातोरात जनावरांची लावली पोलिसांनी विल्हेवाट 
या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या ३० जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रकला लागलेली आग विझेपर्यंत जनावराचाही कोळसा झाला होता. जळलेल्या या जनावरांचे अवशेष पोलिस विभागाने पहाटे ५ वाजण्यापूर्वीच या भागात असलेल्या आणि बंद पडलेल्या एव्हरेस्ट सिमेंट फॅक्टरीच्या परिसरात पुरून त्याची विल्हेवाट लावली. 


दरवेळी आरोपी होतात फरार
जिल्ह्यात विविध ठिकाणी जनावरांची वाहने पकडण्याच्या कारवाई करण्यात येत आहे. त्यात यवतमाळ, कळंब, पांढरकवडा येथे वारंवार कारवाई होत आहे. मात्र फार मोजक्या कारवाईत या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येते. अन्यथा दरवेळी जनावरे भरलेला ट्रक उभा करुन आरोपी पळून गेले अशी नोंद पोलिसांकडून करण्यात आलेली दिसून येते. 


केंद्रीय मंत्र्यांची परवाना रद्दची घोषणा हवेतच 
केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी जनावरे तस्करी प्रकरणात पकडण्यात आलेल्या वाहनांचा परवाना रद्द करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर आतापर्यंत पकडण्यात आलेल्या जनावरे तस्करी करणाऱ्या वाहनांपैकी एकाही वाहनाचा परवाना रद्द करण्यात आल्याचे ऐकीवात नाही. 


त्याच वाहनांचा पुन्हा वापर 
जनावरे तस्करी करण्यासाठी काही विशिष्ट वाहनांचाच वापर सातत्याने करण्यात येतो. अशा प्रकरणात पकडण्यात आलेली वाहने काही दिवसातच सुपुर्तनाम्यावर सोडून देण्यात येतात. मात्र त्यानंतर या वाहनांचा वापर पुन्हा जनावरे तस्करीसाठी करण्यात येतो. वडगाव रोड पोलिसांनी पकडलेल्या अशा वाहनांमध्ये एकच वाहन तस्करी प्रकरणात ३ वेळा वापरल्याचे समजते. 


भाजपचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा 
जिल्ह्यातून पिंपळखुटीमार्गे होत असलेली जनावरांची तस्करी ही बाब गंभीर असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने कारवाई करावी अन्यथा त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा या घटनेनंतर पाटणबोरी येथील भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अमृत भागानगरकर, सुभाष चांदेकर, गजानन सिंगेवार आदींनी दिला. 


दुसऱ्या ट्रकमधून ३० जनावरे सोडली 
या घटनेच्या वेळी आणखी एका ट्रकमध्ये जनावरे कोंबून नेण्यात येत होते. हा ट्रक सद्भावना कंपनीच्या काट्याकडून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र ही घटना पाहून त्यातील आरोपीही ट्रक सोडून पसार झाले. पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेल्या ३० जनावरांची सुटका करुन त्या जनावरांना रासा येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...