आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील सर्वात मोठ्या वाघाला कृत्रिम पाय; डाॅ. बाभूळकर यांनी घेतले दत्तक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- एकेकाळी संपूर्ण ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दहशत असणारा देखणा “साहेबराव’ हा आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ सध्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये केविलवाण्या स्थितीत दिवस काढतोय. शिकाऱ्याच्या सापळ्यात अडकल्याने एका पायाचा पंजा निकामी झालेल्या “साहेबराव’ला कृत्रिम पाय लावले जाणार आहेत. भारतात प्रथमच असा प्रयोग होणार आहे. अस्थिव्यंग तज्ज्ञ डाॅ. सुश्रुत बाभूळकर यांनी त्याला दत्तक घेतले आहे. कृत्रिम पाय लावण्यासाठी महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉक्टर तसेच पशुवैद्यकीय तज्ज्ञांची ते मदत घेणार आहे. जर्मनी येथील ए. ओ. फाउंडेशन तसेच अमेरिकन कंपनी एंडोलाईट  पाय तयार करणार आहे. यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागू शकतो. आधी साहेबरावला बेशुद्ध करून त्याचे दु:ख समजून घ्यावे लागेल आणि नंतरच पायाचा पंजा बसवता येईल, असे डाॅ. बाभूळकर म्हणाले.  २०१२ मध्ये साहेबराव व त्याच्या सोबतचा वाघ “बहेलिया’ शिकाऱ्यांनी पळसगाव येथे लावलेल्या सापळ्यात अडकले. या वेळी अन्य वाघाचा मृत्यू झाला. गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना साहेबराव मृत्यूशी झुंज देताना दिसला. त्यानंतर वनविभागाने साहेबरावला नागपुरात आणले.  


उपचारानंतर साहेबराव वाघ तंदुरुस्त झाला, मात्र पाय सापळ्यात अडकल्याने २ बोटे कापावी लागली. त्याला गेल्या ५ वर्षांपासून ३ पायावरच चालावे लागत आहे. ही वेदना पाहून डॉ. बाभूळकरांनी त्याला दत्तक घेऊन कृत्रिम पाय लावण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मांजर, कुत्रे, हत्तीला कृत्रिम पाय लावण्यात आले आहेत. मात्र वाघांवर हा पहिलाच प्रयोग राहणार असल्याचे ते म्हणाले.  

 

वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाला स्थगिती कायम 

यवतमाळ जिल्ह्यातील हल्लेखोर वाघिणीला गोळ्या घालण्याच्या आदेशावर उच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली. स्थानिकांचा दबाव आणि वाघिणीकडून होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी वाघिणीला गोळ्या घालण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. त्याला मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या सरिता सुब्रमण्यम यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने आधी आदेशाला स्थगिती देत वन विभागाला बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मंगळवारी वन विभागाकडून कुठलेही उत्तर सादर न झाल्याने न्या. धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांच्या पीठाने पुढील आठवड्यापर्यंत स्थगिती कायम ठेवली. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...