आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी दारु विक्रेत्यांच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू, एएसआय गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड शिवारात गावठी दारु काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याला कार्यरत असलेले एएसआय श्यामराव जाधव (५५) व त्यांचे रायटर पोलिस नाईक सतीश मडावी (४३) हे दोघे दुचाकीने मांजरखेड शिवारात गेले. यावेळी दोघांनी मांजरखेड शिवारातील दारु अड्डा उद््ध्वस्त   केला व परत येत असताना त्याच दारु विक्रेत्यांनी दोघांवरही अमानुष हल्ला चढवला. या हल्ल्यात सतीश मडावी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एएसआय जाधव गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. २७) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


एएसआय श्यामराव मडावी यांच्याकडे मांजरखेड बीट आहे. रविवारी सकाळी त्यांना माहिती मिळाली की, मांजरखेड शिवारात एका शेतात दारुची भट्टी लावलेली असून,त्या ठिकाणी गावठी दारु गाळण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एएसआय जाधव व त्यांचे रायटर सतीष मडावी हे दोघे दुचाकीने मांजरखेड गावात गेले. मांजरखेड ते सावंगा विठोबा मार्गावरील एका शेतात दारु गाळण्याचे काम सुरू असल्याचे दिसल्यामुळे त्यांनी सदर भट्टी उदध्वस्त केली व चांदूर रेल्वेच्या दिशेने परत येण्यासाठी निघाले. दरम्यान, त्याचवेळी चार ते पाच दारु विक्रेत्यांनी कुऱ्हाड, काठी, दगडाने अचानकपणे जाधव व मडावी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी मडावी व जाधव यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांची संख्या जास्त होती तसेच हल्लेखोर शस्त्रानिशी होते. त्यामुळे हे जास्तवेळ प्रतिकार करू शकले नाही. त्यांनी दोघांनाही डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर जबर मारहाण केली. यामध्ये जाधव घटनास्थळीच पडले तर मडावी शेताने पळत निघाले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला व काही दूर एका शेतात त्यांच्यावर पुन्हा कुऱ्हाड व अन्य शस्त्राने हल्ला चढवला. इतकेच नाही तर त्यांच्या डोक्यात हल्लेखोरांनी दगड घातला. यामध्ये मडावी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान जाधव यांनी जखमी अवस्थेत मांजरखेडच्या पोलिसपाटील यांना हल्ला झाल्याबाबत माहिती दिली. पोलिसपाटील यांनी चांदूर रेल्वे पोलिसांना कळवले. त्यानंतर माहीती मिळताच चांदूर रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी जाधव व मडावी वेगवेगळ्या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. त्यांना तातडीने चांदूर रेल्वे येथील शासकीय रुग्णालयात आणले त्यावेळी डाॅक्टरांनी मडावी यांना मृत घाेषित केले तर जाधव यांची प्रकृती गंभीर असून, अमरावतीत एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच अमरावती, तिवसा, चंादूर बाजार तालुक्यातील प्रत्येक ठाण्याचे ठाणेदार व पोलिस पथक चांदूर रेल्वेला दाखल झाले होते. पोलिसांनी हल्लेखोरांची माहीती काढून मांजरखेड परिसरात धाव घेवून हल्लेखोरांची धरपकड सुरू केली. दरम्यान सायंकाळपर्यंत पेालिसांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून इतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणात चांदूर रेल्वे पोलिसांनी चार ते पाच हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

हल्लेखांराचा शोध सुरू 
गावठी दारुची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या दोन पेालिसांवर दारुविक्रेत्यांनी हल्ला चढवला. त्यामध्ये पोलिस कर्मचारी सतीश मडावी यांचा मृत्यू झाला तर एएसआय जाधव गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात आम्ही एकाला ताब्यात घेतले असून इतर xm, हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. एम. एम. मकानदार, अप्पर पेालिस अधीक्षक, अमरावती. 
वारंवार कारवाई आणि फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे दारुविक्रेत्यांनी चढवला हल्ला 


मांजरखेड शिवारात दारुची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे एएसआय जाधव व मडावी घटनास्थळी गेले व त्यांनी कुऱ्हाडीच्या सहायाने भट्टी उद््ध्वस्त केली. त्याचवेळी काही अंतरावर दुसरी भट्टी सुरू होती. दोन दारुविक्रेते त्या भट्टीवर होते. त्यांना आवाज येताच ते जाधव व मडावी यांच्याकडे आले. त्यावेळी त्यांनी जाधव यांच्यासोबत वाद घातला. या वादाचे मडावी यांनी मोबाइलमध्ये छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दोन्ही हल्लेखोरांनी जाधव यांच्या हातातील कुऱ्हाड घेवून त्यांच्यावर हल्ला चढवला. पोलिसांकडून या गावठी भट्ट्यावर वारंवार कारवाई सुरू असून वादाचे छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे 


यावेळी मडावी यांनी मोबाइलमध्ये या वादाचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला. तर त्या दारू विक्रेत्यापैकी एकाने जाधव यांच्या हातात असलेली कुऱ्हाड घेतली व त्यांच्या डोक्यावर वार केला. यावेळी मडावी यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडे शस्त्र नव्हते तसेच हल्लेखोर दोघे होते. 

बातम्या आणखी आहेत...