आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार हजारात जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये उभारला चार ते पाच दिवस भाजीपाला ताजा ठेवणारा 'फ्रीज'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - भाजीपाला नाशवंत असल्याने त्याची काढणी झाल्यानतंर त्वरित मिळेल त्या भावात विक्री करावी लागते. विक्री न झाल्यास दिवसभरातच भाजीपाला वाया जाण्याची भिती असते. परंतु येथील श्री शिवाजी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या उद्यानात उभारण्यात आलेल्या कमी खर्चाच्या 'फ्रीज'मुळे भाजीपाला चार ते पाच दिवस ताजा राहण्यास मदत झाली   आहे. भाजीपाला उत्पादकांना या सुमारे चार हजार रुपये खर्चाच्या या 'फ्रीज'मुळे काढणी केलेला भाजीपाला चार-पाच दिवस टिकवण्यास मोलाची मदत होणार आहे. 

 

भाजीपाला काढणीचे काम मोठ्या प्रमाणात होत असल्याने एवढा प्रचंड असलेला भाजीपाल्याची फ्रीजमध्ये साठवणूक करणे व टिकवणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे विक्रीच्या एक दिवस आधी काढणी करून मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना भाजीपाला विकावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात नाशीवंत भाजीपाला खराब होऊन अधिक आर्थिक नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. मोठ्या प्रमाणात भाजीपाला टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कोल्ड स्टोरेजही उभारू शकत नसल्याने त्यांच्या नशीबी तोट्यानेच भाजीपाला विक्री करणे येते. परंतु श्री शिवाजी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या उद्यानात उभारण्यात आलेल्या 'झिरो एनर्जी कुल चेंबर'मुळे एका दिवसात खराब होणार भाजीपाला चार ते पाच दिवस ताजा राहण्याची किमया साधली गेली आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य गंगाधर पुसतकर यांच्या मार्गदर्शनात प्रा. धीरज कदम यांनी या 'फ्रीज'ची उभारणी केली आहे. 


असे आहे 'झिरो एनर्जी कुल चेंबर' 
झिरो एनर्जी कुल चेंबर तयार करण्यासाठी १६५ बाय ११५ सेंमीचे वीटीचे टाके बांधण्यात आले. टाक्याची उंची ६७.५ सेंमी ठेवण्यात आली. चौरस असलेल्या एकेरी विटीच्या दोन भिंतींमधील रुंदी ७.५ सेंमी ठेवण्यात आली. या पोकळीत रेती भरण्यात आली. आतील तापमान कमी ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा रेतीच्या पोकळीत पाणी सोडण्यात येते. टाक्याच्यावर गवत अथवा ग्रीन नेटचे छप्पर करण्यात आले. यामुळे टाक्यातील तापमान बाहेरच्यापेक्षा किमान १० ते १५ अंशापेक्षा कमी राहण्यास मदत होेते. टाक्यातील आर्द्रता ९० टक्के राहत असल्याने भाजीपाला चार ते पाच दिवस टिकून राहतो. या टाक्याच्या बांधकामासाठी सरासरी साडे तीन ते चार हजार रुपये खर्च आल्याची माहिती प्रा. धीरज कदम यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...