आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी नाकारल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; आमदारांच्या हातातले गुलाब हातातच राहिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भाजप सरकारविराेधात काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा मंगळवारी दुपारी ५ वाजता संपला. अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावरून खाली उतरले. व्यासपीठाच्या शेजारी अनिल देशमुख यांची पवारांना जाण्यासाठी आॅडी गाडी लावली होती. पवार सुरक्षा रक्षकाच्या गराड्यात लगबगीत गाडीत बसू लागले, दरम्यान वाढदिवसानिमित्त  पवारांना गुलाबफूल देण्यासाठी नेत्यांची चढाओढ लागली. पण पवारांनी एकाचाही गुलाब स्वीकारला नाही, ते थेट गाडीत बसून निघून गेले, त्यामुळे नेत्यांच्या हातातील ताटकळलेले गुलाब अखेर त्यांच्याच हातात राहिले.


शरद पवार आपल्या वाढदिवसाला मोठा डामडौल करत नाहीत. पूर्वी ते वाढदिवसाला पुण्यातील बारामती हाॅस्टेलवर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार करत. मंगळवारी जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा आणि पवार यांचा ७७ वा वाढदिवस नेमका  एकाच दिवशी आला होता. त्यामुळे पवार यांनी वाढदिवसाचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम ठेवला नव्हता. त्यातच त्यांची तब्येतही ठीक नव्हती. मंगळवारी सकाळीच ते रुग्णालयातून बाहेर पडले. कालच त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 


‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाबांच्या वाढदिवसाला कोणताही कार्यक्रम ठेवू नये’, अशा सूचना त्यांची कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे पवार यांच्या ढदिवसानिमित्त शहरात एकही बॅनर, फ्लेक्स दिसले नाहीत. नाही म्हणायला व्यासपीठावर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते एक गुच्छ देवून पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तो सुद्धा पवार यांनी नाखुषीनेच स्वीकारला.   राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना पवार यांना शुभेच्छा द्यायच्या तर होत्याच, पण कशा द्यायच्या, हा प्रश्न होता. बरे पवार काही मोठा हार किंवा भपकेबाज गुच्छ स्वीकारतील का? याबाबत शंका हाेतीच. त्यामुळे अनेकांनी सभेच्या पूर्वी एक एक गुलाब खिशात ठेवले होते. सभा संपल्यावर पवारांना द्यायचा, अशी तयारी केली होती. त्यासाठी अनेकांनी व्यासपीठावर जागा पकडल्या होत्या. मात्र पवार सभा संपताच व्यासपीठावरून उतरले अाणि थेट गाडीत जाऊ लागले. त्या दोन, तीन मिनिटात किमान पन्नासएक गुलाब त्यांच्या समोर आले, पण पवारांनी एकही गुलाब स्वीकारला नाही. त्यामुळे नेते नाराज झाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातातली गुलाब अखेर हातातच राहिले.

बातम्या आणखी आहेत...