आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीसोबत अश्लील चाळे;आरोपीला कारावास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष देवून घरात नेऊन चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या (क्रमांक ६) न्यायाधीश व्ही. डी. इंगळे यांनी दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायालयाने शनिवारी (दि. २१) सुनावला आहे. धनराज सदाशिव मोलके (५०, रा. मंगरुळ भिलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 


या प्रकरणात चिमुकलीच्या वडिलांनी ७ फेब्रुवारी २०१७ ला शिरखेड पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी धनराज मोलकेविरुध्द अत्याचार तसेच बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ७ फेब्रुवारीला पीडित चिमुकलीचे वडील व आई कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चिमुकली एकटीच घरी होती. दरम्यान ते घरी आले त्यावेळी त्यांना मुलगी दिसली नाही. म्हणून त्यांनी मुलीचा शोध घेतला तर त्यांना गावातील एका व्यक्तीने सांगितले कि, धनराज मोलके नामक व्यक्तीने तुमच्या मुलीला काही वेळापुर्वी सोबत नेले आहे. त्यामुळे चिुमकलीचे वडील मुलीच्या शोधात त्याच्या घरी पोहचले तर धनराज मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसून आला. 


या प्रकारामुळे मुलगी रडत होती. त्यामुळे त्यांनी मुलीला जवळ घेवून संतापाच्या भरात धनराजला मारहाण केली.त्यानंतर शिरखेड पोलिसात जाऊन धनराजविरुध्द तक्रार दिली. दरम्यान गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. प्रकरणाचा तपास शिरखेड ठाण्याचे तत्कालीन एपीआय सचिन तायवाडे यांनी पुर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणीदरम्यान बारा साक्ष तपासण्यात आल्या.न्यायालयाने मोलकेला दहा वर्षे कारावास, एकूण १५ हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी सरकारी पक्षाकडून अॅड. सोनाली क्षीरसागर यांनी यशस्वी युक्तीवाद केला. 

बातम्या आणखी आहेत...