आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणी गणना; 31 मार्च पर्यंत मिळणार अहवाल; वाघांच्या आकडेवारीबाबत संदिग्धता होणार दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- वाघांच्या आकडेवारीबाबत नेहमीच संदिग्धता असते. कारण व्याघ्र गणना वा प्राणी गणनेत अजूनही म्हणावी तशी अचूकता आलेली नाही. पण या वेळेस शनिवार २० पासून राज्यात सुरू होणाऱ्या प्राणी गणनेत अचूकता आणण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. २५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या प्राणी गणनेत मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. 


वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या गणनेत पहिले तीन दिवस मांसभक्षी व माेठ्या तृणभक्षी प्राण्यांची गणना केली जाईल. प्राण्यांच्या पायाचे ठसे, विष्ठा, झाडांवरील ओरखडे, केलेल्या शिकारी, उकरलेली माती आदी विविध नोंदी घेण्यात येतील. त्या नंतर आखून दिलेल्या ट्रॅन्झॅक्ट लाइनवर चालत जाऊन तृणभक्षी प्राण्यांची गणना करण्यात येईल. सूर्योदयानंतर सुरू होणाऱ्या गणनेत प्राणी व पिलांची गणना हाेईल. निवडलेल्या प्रदेशात कोणते वृक्ष आहे, मानवी हस्तक्षेप, वृक्ष कटाई वा चराईच्या खुणा दिसतात का, या बाबी तपासल्या जाईल. 


पुढील दोन टप्प्यांमध्ये कॅमेरा ट्रॅप आणि मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात येईल. वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाला ३१ मार्चपर्यंत अहवाल पाठवण्यात येईल. 


मोबाइल अॅपद्वारे अचूक नोंद 
यापूर्वीच्या गणनेत देशभरात २२२६ वाघ तर महाराष्ट्रात १८० वाघांची नोंद करण्यात आली. प्राणी आणि वनस्पतींची अचूक नोंद व्हावी यासाठी मोबाइल अॅपची मदत घेण्यात येणार आहे. 


माॅनिटरींग सिस्टिम फाॅर टायगर इन्सेंटिव्ह प्रोटेक्शन अॅण्ड इकाॅलाॅजीकल अॅप वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने विकसित केले आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या अॅपद्वारे नोंदी करायच्या आहे. 


या अॅपद्वारे वनरक्षकांना बीटमधील छायाचित्रे तसेच जीपीएस को-आॅर्डिनेस मिळण्यात मदत होईल. वनरक्षकाने त्याच्या ठिकाणाहून अपलोड केलेल्या नोंदी थेट केंद्रीय सर्व्हरकडे नोंदवल्या जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचे नियंत्रण नागपुरातून करण्यात येणार आहे.