आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अातापर्यंत 22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आतापर्यंत राज्यातील २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले असून एकूण ४७ लाख खातेधारकांचे कर्ज फेडण्यासाठी संबंधित बँकांना पैसे दिले अाहेत, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. जे शेतकरी पात्र असतानाही कर्जमाफीसाठी अर्ज करु शकले नाहीत त्यांना अजूनही अर्ज करण्याची संधी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.


राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करून सहा महिने उलटल्यानंतरही शेतकऱ्यांचा सात- बारा कोरा न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले होते. बुधवारी सत्ताधारी पक्षातर्फे नियम २९३ अंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्याला गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.  


मागील सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत अनेक त्रुटी असल्याचे नंतर समाेर अाले. तेव्हा मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांना कर्जमाफी दिली आणि काही ठिकाणी बँकांनी आपले भले करून घेतले. काही जिल्हा बँकांनी घोस्ट अकाऊंटच्या माध्यमातून आपला फायदा करून घेतला. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याचे लेखानियंत्रकांनीही स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यावेळच्या त्रुटी टाळून पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी जमिनीची अट काढून टाकण्यात आली. वेळेवर कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यातून सरकारी कर्मचारी, १५ हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे पेन्शनधारक, आयकर भरणारे आणि लोकप्रतिनिधींना वगळण्यात आले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

 

टीका झाली पण खरे शेतकरी समोर आले
गैरप्रकार टाळण्यासाठी आम्ही ऑनलाईन अर्ज मागवले. आमच्यावर खूप टीका झाली परंतु त्यामुळेच खरे आणि पात्र शेतकरीच समोर आले. सुरुवातीला बँकांनी ८९ लाख शेतकऱ्यांकडे ३४ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले. मात्र, ऑनलाईन पडताळणी केली असता एका बँकेने साडेसहा लाख खातेधारकांची दिलेली यादी फक्त एक लाख ३९ हजारवर आली. त्यानंतर दुबार नावेही काढून टाकली आणि ६९ लाख खातेधारकांची माहिती गोळा करणे सुरू केले. बँकांनी त्यांच्याकडील माहिती दिल्यानंतर ४३ लाख १६ हजार ७६८ खातीच समोर आली.

 

ऑनलाईनमुळेच खरे लाभार्थी समोर आले. त्यानंतर बँकांना पैसे पाठवले असून प्रत्येक तासाला कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

 

खडसेंचे अभिनंदन 
जळगाव जिल्हा बँकेने सर्वात जलद १.७१ लाख खात्यांमध्ये पैसे जमा केले आहेत. यासाठी एकनाथ खडसे यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, कर्जमाफीला ‘फसवणीस सरकारची शेतकरी योजना’ नाव द्या : धनंजय...

बातम्या आणखी आहेत...