आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- भाजपला टाटा करून खासदारकीचाही राजीनामा देणारे माजी खासदार नाना पटोले आता सिंदखेडराजा ते भंडारा-गोंदिया अशी पश्चात्ताप यात्रा काढणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा पश्चात्ताप म्हणून ही यात्रा काढली जाणार असल्याची माहिती पटोले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
भाजपशी काडीमोड घेत पटोले यांनी खासदारकीचाही राजीनामा देत विदर्भात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पटोले यांनी सिंदखेडराजा ते भंडारा-गोंदिया पश्चात्ताप यात्रेची योजना सांगितली. १२ जानेवारीला जिजाऊंच्या जयंतीदिनी ही यात्रा सिंदखेडराजा येथून निघणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा सुमारे चारशे किलोमीटरचा प्रवास करत पश्चात्ताप यात्रा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पोहोचणार असून या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी यात्रेचा जाहीर समारोप होणार आहे. या यात्रेत काही मान्यवरांनाही सहभागी करून घेण्याचे आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगताना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यात दाभडी येथे शेतकऱ्यांना भरघोस आश्वासने दिली होती. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफ्याची तरतूद सुचवणाऱ्या स्वामिनाथन अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता तर झाली नाहीच; पण शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी चिंताजनक असून आत्महत्या वाढल्या आहेत. त्याचा पश्चात्ताप म्हणून ही यात्रा काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेची अधिकृत घोषणा येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ओबीसींना संघटित करण्याचे प्रयत्न
सध्या अोबीसी संग्राम संघटनेच्या माध्यमातून अोबीसींना संघटित करण्याचे प्रयत्न पटोले यांनी चालवले आहेत. त्यानिमित्ताने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका सुरू आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी गेलेल्या पटोले यांनी काँग्रेस प्रवेशाबाबत अद्याप कुठलाच निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले. भंडारा आणि गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याबाबत अद्याप विचार केलेला नसून प्रतिस्पर्धी पाहून निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वतः निवडणूक न लढल्यास या मतदारसंघात आपण तुल्यबळ उमेदवार देऊ, असा दावाही पटोले यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.