आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्स्टिट्युटने 59 विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती हडपल्याचा धक्कादायक प्रकार; फसवणुकीचा गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विद्यार्थिनींना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शहरातील एका इन्स्टिट्युटने तब्बल ५९ विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती हडपल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. २४) समोर आला असून, या प्रकरणी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री प्रशिक्षण देणाऱ्या संबंधित इन्स्टिट्युटच्या अध्यक्ष व संचालकांसह प्रकल्प आदिवासी विकास विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


विद्यार्थिनींना पारपरिक शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून पाच ते सहा वर्षांपूर्वी एक योजना सुरू केली होती. इन्स्टिट्युटमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थीनीला शासनाच्यावतीने २ हजार ३०० रुपये शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. दरम्यान अमरावती शहरातील फुलवंताबाई इन्स्टिट्युट ऑफ कॉम्पुटर इन्फॉरमेशन, गाडगेनगर, अमरावती यांनीही विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम देण्यासाठी २०१२ - १३ मध्ये गाडगेनगरमधील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना या इन्स्टिट्युटमधील व्यक्ती जाऊन भेटला व त्याने सदर व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी इच्छूक मुलींना विचारणा केली. 


अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र तसेच शिष्यवृत्ती देण्यात येईल असे सांगितले. या विद्यार्थिनींना आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येणार होती. मुलींना अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतवेळी शैक्षणिक कागदपत्र मागितले होते. विद्यार्थिनींनी ते दिले. त्यानंतर फुलवंताबाई इन्स्टिट्युट ऑफ कॉम्पुटर इनफॉरमेशन मध्ये 'वेब डिजाईनिंग'चे प्रशिक्षणासाठी बोलवले. त्यानंतर प्रशिक्षण वर्ग सुरू झालेत. सुरूवातीला एक महिना काही प्रमाणात शिकवले गेले मात्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षेदरम्यान इन्स्टिट्युटमधील एका व्यक्तीने प्रश्नांचे उत्तर देऊन पेपर सोडवले. त्यानंतर मात्र परीक्षेचा निकाल काय आला हे माहीत नसल्याचे तक्रारदार युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर मात्र या मुली सदर इन्स्टिट्युटमध्ये गेल्या नाहीत. याच इन्स्टिट्युटमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या वर्ष २०१२ - १३ मधील ५९ विद्यार्थिनींच्या नावावरील शिष्यवृत्ती प्रत्येकी २ हजार ३०० या प्रमाणे १ लाख ३५ हजार ७०० रुपये परस्पर उचलण्यात आली. शिष्यवृत्ती संबधित विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर जमा व्हायला पाहिजे होती. मात्र इन्स्टिट्युट व प्रकल्प आदिवासी विकास विभाग यांच्या संबधित अधिकाऱ्यांनी परस्पर रक्कम हडपल्याचे तक्रारीत नमूद असल्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


नागपुरातून आले होते विशेष पोलिस पथक 
अशाच प्रकारे शिष्यवृत्ती हडपल्याचे नागपुरात एक मोठे प्रकरण पुढे आले आहे. त्याच ठिकाणी अमरावतीतही असाच गैरप्रकार असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्यामुळे नागपूर पोलिस मंगळवारी शहरात आले व त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...