आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: वाॅटर कप स्पर्धेमुळे १५ वर्षांपासून कोरडी विहीर काठोकाठ भरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी- सामाजिक एकतेची प्रतिक ठरलेल्या घुटी येथील मनकर्णा विहिर १५ वर्षांपासून कोरडी पडली होती. परंतु अमीर खानच्या पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कॅप स्पर्धेअंतर्गत झालेल्या श्रमदानातून मनकर्णेला नवसंजीवनी मिळाली असून, ती आज काटाेकाट भरली आहे. मेळघाटातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या खेड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत असताना घुटी येथे आदिवासींच्या श्रमदानाचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे. घुटी येथे पाणी फाऊंडेशनने लक्ष केंद्रीत केल्यामुळे आखी, धाराकोट आणि घुटी ही तीन गावे भर उन्हाळ्यात जलक्रांतीने बहरून निघालेली आहे. 


घुटी येथे वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून भूजल पातळी वाढली. घुटी गावात गवळी समाजाच्या गोपालांनी पाण्यासाठी एक सार्वजनिक विहीर बांधली होती. परंतु ही विहीर १५ वर्षांपासून कोरडी पडली होती. कोरडी पडलेली विहीर बुजविण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतला होता, परंतु वॉटर कपच्या श्रमदानाची चळवळ गावात पोहोचली अन् मनकर्णेचे रुपडेच पालटले. 


श्रमदानातून हरितक्रांती घडवून आणण्याची चळवळ आता आदिवासी भागापुरती मर्यादित राहलेली नाही. याचा परिणाम जलपातळीवर होत आहे. हजारो शोष खड्डे तयार करून मेळघाटातील पाणी समस्येवर कायम स्वरुपी मात करता येईल. 
- डॉ. उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, पं.स, धारणी 


पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाच्या चळवळीतून घुटी गावाची दशा आणि दिशाच बदलली आहे. घुटी येथील पालटलेले चित्र पाहून धारणी तालुक्यातील अन्य आदिवासीही श्रमदानाच्या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले आहेत. 
- रामेश्वर तोटे, जलमित्र, घुटी